बीडसह जिल्हाभरात भव्यदिव्य मोर्चे निघणार, मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-संविधान बचाव समिती
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : देशभरात द्वेषाचे राजकारण सर्रासपणे सुरू आहे. कधी अल्पसंख्यांक समाजावर अन्याय तर कधी समाजातील लोकांवर हल्ले तर कधी मुस्लिम धर्माचे पैगंबर यांच्याबाबत अपशब्द काढून मुस्लिमांच्या भावना चिरडल्या जात आहेत. अशा भयावह आणि भीतीदायक परिस्थितीत अखंड भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षात संविधानाला मुठमाती देत सरकार हत्या आणि बलात्कार करणाऱ्याची बाजू घेत त्यांची शिक्षा माफ करत आहेत. अशा सरकारच्या विरोधात गुरुवारी (दि.15) रोजी कलेक्टर कचेरीवर महिलांचा संविधान बचाव समितीच्या वतीने मुकमोर्चा निघणार आहे.
बीड तालुक्याचा मोर्चा ऐतिहासिक किल्ला मैदान (जामा मस्जीद परिसर) येथून कलेक्टर कचेरीवर धडकणार आहे तर अन्य तालुक्यात मोर्चेकरी तहसील कार्यालयावर धडकून आपला निषेध नोंदवणार आहेत. संविधान बचाव मुकमोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे. बीडमधला मोर्चा हा किल्ला मैदान येथून निघून कारंजा रोड, राजुरीवेस, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज चौक असा निघणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
बघता काय सामील व्हा
अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो, असे संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. त्यामुळे लोकाहो, सरकारच्या अंधाधूंद आणि धर्मांध धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी एकत्रित या म्हणत संविधान बचाव समितीने उद्या जिल्हाभरात महिलांच्या मुकमोर्चाचे आयोजन केले आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
गेल्या काही वर्षांपासून सर्वसमावेशक असलेल्या अखंड भारतात थेटपणे धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी कामांना अंजाम देण्याहेतू मुस्लिम समाजाला टार्गेट करत कधी लोकांवर हल्ले करतात तर कधी मुस्लिम धर्माचे सर्वस्व मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अपमानजनक टिपणी करत आपली विकृती समाजासमोर आणतात. अशा लोकांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कायदा करा, बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची माफ केलेली शिक्षा रद्द करून त्यांना पुन्हा शिक्षा द्या, बलात्काराच्या घटनांना आळा घाला, बलात्काऱ्याना फाशी द्या, मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप मागे घ्या, त्यांची सुटका करा, आसाममध्ये होत असलेल्या मदरशाविरूद्ध कारवाई तात्काळ थांबवा, पाडलेले मदरसे पुन्हा बांधा, अल्पसंख्याक समाजावर होत असलेले हल्ले, अन्याय पाहता अॅट्रॉसिटीसारखा कायदा करा, अशा महत्वपुर्ण मागण्या घेत महिलांचा भव्य निषेध मुकमोर्चा कलेक्टर कचेरीवर धडकणार आहे.
तालुकास्तरावरही निघणार मोर्चे
संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने बीडसह अंबाजोगाई, परळी, माजलगाव, आष्टी, पाटोदा, धारूर यासह अन्य ठिकाणीही भव्यदिव्य मोर्चे निघणार असून या मोर्चाची पुर्ण तयारी झाली आहे. मोर्चात तालुकास्तरावर गावपातळीवरील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.