तज्ञ डॉक्टर पाहिजे असतील तर देहदान करा -सीएस डॉ. सुरेश साबळे
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : सुंदरआई आय डोनेशन ट्रस्टच्या उदघाटन प्रसंगी करून सुंदरआई आय डोनेशन ट्रस्टने नेत्रदानाचा जो उपक्रम हाती घेतला आहे. तो मराठवाड्यातील पहिला उपक्रम आहे. भारतामध्ये नेत्रदान, देहदान या बद्दल अनेक गैरसमज असून त्यामुळे रुग्णालयात वेळेवर अवयव दान उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण मोठे आहे. मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरीता आठ विद्यार्थ्यामागे एक देह आवश्यक असून काही कॉलेज मध्ये 50 विद्यार्थी एक बॉडीवर अभ्यास करत आहेत. तज्ञ डॉक्टर पाहिजे असतील तर देहदान करा. असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी केले.
शहरातील पांगरीरोड वरील काशिनाथ गिराम नगर येथे शुक्रवारी (दि.9) सुंदरआई आय डोनेशन ट्रस्टचे मोठ्या थाटात उदघाटन सुंदरआई दगडू नाईकवाडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन सीएस डॉ. सुरेश साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड होते. यावेळी राजकुमार घायाळ, अॅड. अजित एम. देशमुख, डॉ. संजय कदम, नवनाथ नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांनी नेत्रदान व देहदान याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजक तथा संस्थपाक अध्यक्ष नवनाथ नाईकवाडे यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले, की माझ्या आई-वडीलांनी देखील नेत्रदान केले असून माझ्या कुटुंबापासून नेत्रदान चळवळ सुरू केली असून इतर सात जणांनी देखील नेत्रदान करून गरजूंना त्याचा फायदा झाला आहे. मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाठी तसेच तज्ञ डॉक्टर घडावेत यासाठी मी स्वत: व पत्नीने देखील देहदान करण्याची यावेळी ग्वाही देवून भविष्यात सुंदरआई आय डोनेशन ट्रस्ट चे बीड जिल्ह्यात एक गाव एक कार्यकर्ता असे उदिष्ट असल्याचे नाईकवाडे यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करतांना गौतम खटोड म्हणाले की, या संस्थेचे सर्व विश्ववस्त यांच्या सहकार्याने या संस्थेचे भविष्यात वटवृक्षात रूपांतर होईल हे निश्चित आहे. मी सुद्धा माझे देहदान जाहीर करत आसल्याचे खटोड म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम हिंदोळे यांनी तर आभार संस्थेचे विश्ववस्त बलभीम बजगुडे यांनी मानले. यावेळी डॉ. अमोल लुनावत, डॉ. अमोल खेत्रे, डॉ. शिल्पा खेत्रे तसेच आनंदऋषी नेत्रालय अहमदनगरचे सर्व तज्ञ डॉक्टरांची टीम, जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीचे तंत्रज्ञ, विश्वस्त भागवतराव चाळक, शुभम रांजनकर, शेरजमा खाँ पठाण, शुभम नाईकवाडे, लता नाईकवाडे, राहुल शेवाळे, उत्कर्ष धपाटे, सिध्दार्थ मुनोत, धनंजय जाधव व सर्व विश्वस्त मंडळ व नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ट्रस्टच्यावतीने वडीलांचे व आजीचे देहदान करणारे देशमुख व मौजकर यांचा सत्कार
वैद्यकीय शिक्षण घेतांना अभ्यासाद्वारे तज्ञ डॉक्टर घडावेत तसेच समाजातील गरजूंना देहाचा फायदा व्हावा या उदात्त हेतू डोळ्या समोर ठेवणारे विजयकुमार देशमुख यांनी आपल्या वडीलांचा देह तसेच कुशल मौजकर (जैन) यांनी आपल्या आजीचा देह अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति. वैद्यकीय महाविद्यालयास देवून सामाजिक बांधिलकी जोपण्याचे कार्य केल्याबद्दल त्यांचा सुंदरआई आय डोनेशन ट्रस्टच्यावतीने पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, हार घालून सत्कार करण्यात आला.