मेटे साहेब,पत्रकार रईसखान सारखे दोन चांगले मित्र गमावल्याचे शल्य व समाजकंटकाच्या कृत्याने व्यथीत होऊन घेतला निर्णय
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : केजीएन ग्रुप संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा महाराष्ट्र मुस्लिम शाह (फकीर) छप्पर बंद विकास मंडळ चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जहीर अली शाह कादरी यांनी आपण यंदा 11 सप्टेंबर रोजी येणारा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कळविले आहे.
दरवर्षी सामाजिक कार्यकर्ते जहीर अली शाह कादरी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नुकतेच शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार विनायकराव मेटे आणि पत्रकार प्रा. रईसखान यांच्या दु:खद निधनामुळे तसेच अलीकडच्या काळात इस्लाम धर्मियांना डिवचण्यासाठी समाजातील काही समाज कंटकांकडून जाणून बुजून अल्लाह, रसूल आणी कुरआन बद्दल सुरू असलेल्या उपद्व्यापाने व्यथित होऊन यावेळी आपण आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कुणीही आपल्याला वाढिदवसानिमित्ताने शुभेच्छा संदेश, हारतुरे, बुके, पेढे वगैरे आणू नये. तसेच कोणीही व कुठेही डिजिटल बॅनर, पोष्टर ही लाऊ नये अशी विनंती केली आहे.
जहीर अली शहा कादरी हे शहरातील एक सुसंस्कृत व सर्वधर्मसमभाव मानणारे मितभाषी व्यक्तिमत्व लाभलेले गोरगरिबांच्या अडीअडचणीत धावून जाणारे महिन्यातून एकदा गोरगरिबांना अन्नदान करणारे दरवर्षी पवित्र रमजान महिन्यात गोरगरिबांची ईद चांगली साजरी व्हावी म्हणून मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या या सर्व सामाजिक कार्यामुळे समाजातील अनेक गणमान्य व्यक्तींसह संपादक, पत्रकार, व्यापारी आणी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसोबत त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. यामुळे अनेकांशी त्यांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. अशाच प्रकारे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्यासोबत राजकीय नाही तर भाविनक मित्रत्वाचे पारिवारिक असलेले संबंध व पत्रकार प्राध्यापक रईस खान यांच्यासोबत त्यांची घनिष्ठ मित्रता होती. परंतु नुकतेच या दोघांचे अकस्मात निधन झाल्याने दोन चांगले मित्र गमावल्याचे शल्य त्यांच्या मनाला यातना देत आहेत. हे कमी होते की काय म्हणून काही दिवसांपासून इस्लाम धर्मियांना डिवचण्यासाठी समाजातील काही समाजकंटक जाणून बुजून अल्लाह, रसूल आणि कुरआन बद्दल करत असलेल्या उपद्व्यापाने त्यांचे मन अत्यंत व्यथित झाले असून यामुळे यावेळी काही दिवसांवर आलेला वाढदिवस साजरा करायचा नाही असे ठरविले असून वाढदिवशी किंवा अगोदर अथवा नंतर कुणीही आपल्याला शुभेच्छा संदेश, हारतुरे, पुष्पगुच्छ, पेढे वगैरे आणू नये व देऊ ही नये. शिवाय कोणीही व कोठेही डिजिटल बॅनर लावू नये. अशी विनंती जहीर अली शाह कादरी यांनी केली आहे.