By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहरातील पत्रकार प्रा. रईस खान यांचे नुकतेच दुःखद निधन झाल्याने जिल्ह्याच्या खा. प्रीतम ताई मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
अत्यंत संघर्षमय जीवन जगत रईसखान प्राध्यापक पदापर्यंत पोहोचले होते. शिक्षण घेत असतानाच त्यांना पत्रकारितेचा छंद लागला होता. यामुळे त्यांनी उर्दू वृत्तपत्रातून अनेक वर्षे पत्रकारिता केली. खडतर दिवस जाऊन नुकतेच कुठे चांगले दिवस येऊ लागले होते. अशातच २२ जून रोजी त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यांच्या हृदयाची इन्जीओप्लास्टी करावी लागली. त्याला अवघे दोनच महिने होत नाही तोच २२ ऑगस्ट रोजी पुन्हा ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे दुःखद निधन झाले. अवघ्या चाळीशीच्या आत त्यांना नियतीने आपल्यातून हिरावून नेले.
या दुःखातून त्यांच्या कुटुंबीयांना धीर मिळावा म्हणून जिल्ह्याच्या खा. प्रीतम ताई मुंडे यांनी रईसखान यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी खान कुटुंबीयांना धीर देत प्रीतम ताई म्हणाल्या की, नियतीला जे मान्य होते ते झाले. आता रईसखान यांच्या पश्चात आपल्याला उभे राहायचे आहे. मुलांचे शिक्षण चांगले व्हावे याकरिता प्रयत्न करायचे आहे. यासाठी मी सदैव आपल्या पाठीशी उभी आहे. असे म्हणत मायेची उब दिली. यावेळी रईसखान यांच्या पत्नी, मुली-मुले, सासरे नईम जागीरदार, सलीम जहाँगीर आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद हसीन अख्तर यांची प्रमुख उपस्थिती होती.