जिल्ह्यातील शेतकऱ्यांची २८ कोटी २५ लाखांची मदत रखडली
By MahaTimes ऑनलाइन |
सन २०२०-२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत जमीन खरडून गेल्याने आणि घरांची पडझड झाल्याने बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. शेतकऱ्यांना मंजूर झालेली २८ कोटी २५ लाख रुपयांची मदत दोन वर्षानंतरही मिळालेली नाही. पटेल फाऊंडेशनचे अध्यक्ष शाहेद पटेल ,दत्ता तीपाले ,गणेश बुधनर,रीजवान पठान हे या प्रश्नी पाठपुरावा करत असून मंगळवारी त्यांनी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांची भेट घेत निवेदन दिले. आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या माध्यमातून ही भेट झाली.
बीड जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये अतिवृष्टी झाली होती. सर्वच तालुक्यात नुकसान झाले होेते. बीड तालुक्यातील नांदुरहवेली, खामगाव, आहेर चिंचोली, तांदळवाडी हवेली, भाटसावंगी, कुर्ला, पारगाव जप्ती, माळापूरी, पिंपळनेर, ताडसोन्ना या गावातील नदीकाठच्या शेतकऱ्यांची जमीन पुराच्या पाण्यामुळे खरडून गेली होती. जिल्ह्यातील हजारो शेतकरी बाधित झाले होते. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३७ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर अनुदान जाहीर केले होते. मंडळ अधिकारी, कृषी विभागाने पंचनामे केले होते. २८ कोटी २५ लाख रुपयांच्या मदतीची तालुकानिहाय यादी प्रशासनाने पाठवली होती. मात्र, दोन वर्षानंतरही अद्याप हे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.
पटेल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहेद पटेल हे या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करत आहेत. मंगळवारी त्यांनी मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांची भेट घेत हा प्रश्न मांडला. या वेळी गुप्ता यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. अशी माहिती पटेल यांनी दिली.