शिवसंग्राम व मेटे परिवाराच्या सदैव सोबत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष स्व. विनायकरावजी मेटे यांच्या अपघाती निधनानंतर शिवसंग्रामच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी नरिमन पॉईंट, मुंबई येथे शोकसभेचे आयोजन केले.
या शोकसभेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. ना.देवेंद्रजी फडणवीस, स्व. विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योतीताई मेटे, कन्या आकांक्षा, माजी मंत्री तथा आ. धनंजय मुंडे, मा. ना. मंगलप्रभात लोढा, राज्यसभा सदस्य रजनीताई पाटील, मा. आ. अशोक चव्हाण, मा.आ. बाळासाहेब थोरात, मा.आ. नाना पटोले, आमदार डॉ. भारती लव्हेकर, आमदार श्वेता महाले, आमदार मंदा म्हात्रे, माथाडी कामगार संघटनेचे नरेंद्र पाटील, शिवसंग्रामचे अध्यक्ष तानाजी शिंदे, सदाभाऊ खोत, महादेव जानकर उपस्थित होते.
या शोकसभेत स्व. विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली अर्पित करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज हरपला तथा अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारा नेता महाराष्ट्राने गमावला. स्व. मेटे यांचे बलीदान व्यर्थ जावू देणार नाही अशा शब्दात श्रद्धांजली अर्पित केली. तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांना श्रद्धांजली अर्पित करताना त्यांच्या आरंभीच्या जीवन कार्यापासून ते आजतायागत सामाजिक व राजकीय कार्यावर प्रकाश टाकला. यामध्ये त्यांनी म्हटले की स्वर्गीय विनायकराव मेटे यांचे आणि माझे मैत्रीपूर्ण संबंध होते. स्व. मेटे साहेब माझी आवर्जून भेट घ्यायचे, संपर्कात असायचे.
ना. फडणवीस यांनी आरंभीच्या जीवनावर प्रकाश टाकताना म्हटले सलग पंचवीस वर्ष आमदार म्हणून त्यांनी काम पाहिले. ते बोलताना एक अभ्यासपूर्ण मत मांडायचे आणि अत्यावश्यक, गरज वा बाब कोणती? यावर ते प्रकाश टाकायचे. विधान परिषदेवर सदस्य म्हणून जाण्यापूर्वी त्यांनी रोजंदारीवर काम केलं. असा काम करणारा महाराष्ट्रातील पहिलाच आमदार म्हणजे विनायकराव मेटे हे आहेत. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावं व युगे-युगे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देत राहील. ही संकल्पना सुद्धा स्वर्गीय विनायकराव मेटे यांची असून आगामी काळात हे स्मारक पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार. शिवसंग्राम व मेटे परिवाराच्या सदैव सोबत अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.