औरंगाबाद येथे भव्यदिव्य समारंभात गौरव
By MahaTimes ऑनलाइन |
सकाळ उद्योग समूहातर्फ दिला जाणारा सकाळ आयडॉल महाराष्ट्र-2022 आयडॉल ऑफ महाराष्ट्र वुमेन इन्फलुएन्सर व मदर्स हू इन्स्पायर हा मानाचा पुरस्कार बीडच्या माजी नगराध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांना आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे, सकाळ मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
औरंगाबाद येथे भव्यदिव्य समारंभात टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये मराठवाड्यातील अनेक नामवंत महिलांचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि कौटूंबीक कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी दीपा मुधोळ-मुंडे यांनी महिलांमध्ये क्षमता आहे म्हणूनच तर त्या सर्वच क्षेत्रात उत्तूंग भरारी घेत आहे. प्रत्येक महिलेने स्वतःची क्षमता ओळखून त्याला परिश्रमाची जोड दिली तर यश नक्की तुमचेच आहे. इंग्रजी भाषा ही महत्वाची आहेच त्यासाठी मुलांना बळजबरी करू नका, युपीएससीच्या परिक्षा ही आपल्या भाषेतून देता येते. मुलांवर आपण काय संस्कार करतो या कडे अधिक लक्ष द्यायला हवे. सध्याच्या काळात संस्कार कुठे तरी बाजूला पडल्याचे चित्र दिसत आहे. आपला देश म्हणजे काय, आपली संस्कृती म्हणजे काय, संविधान म्हणजे काय, वंदे मातरम म्हणजे काय या बाबींची जाणीव मुलांना करून दिली पाहिजे. राष्ट्र प्रेम त्यांच्यात रूजवल गेलं पाहिजे असे मत मांडले.
डॉ.दीपा भारतभूषण क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतात सामाजिक जडणघडणीत वृत्तपत्राचे महत्वाचे स्थान आहे. महिलांसाठी व्यासपीठ मिळवून देणे आणि महिलांच्या प्रश्नांना बातम्यांमध्ये स्थान देणे यामुळे वर्तमानपत्राची विश्वासर्हता वाढली आहे. मातृ पुरस्कार दिल्यामुळे माझी जबाबदारी अधिकच वाढली आहे असे प्रतिपादन केले.यावेळी त्यांना आई सुहासिनी इर्लेकरांच्या…
दिला जन्म तू विश्व हे दाविलेस,
किती कष्ट माये सुखे साहिलेस,
जिण्यालागी आकार माझ्या दिलास,
तुझ्या वंदितो माऊली पाऊलास ।
…या ओळींची आठवण झाली. आयुष्यात कोणत्या मार्गाने चालयचं हे आईनं शिकवलं.
कुणी हिन्दु वा मुसलमान
कुणी शिख बौध्द आहे
अभिमान हा मला की
मी भारतीय आहे. …
असाही राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आपल्याला आईकडूनच मिळालेला आहे असे त्या म्हणाल्या. आपल्या सामाजिक, शैक्षणीक, राजकीय, सांस्कृतिक व कौटूंबीक कार्यकिर्दीच्या यशाचे सर्व श्रेय त्यांनी आई -वडिल, सौ. केशरकाकू नाना व पती डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांना दिले आहे.
यावेळी औरंगाबाद शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निकिता मांजरंमकर यांनी केले तर आभार अनिकेत गोरे यांनी मानले.