शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय व गृहसंकुलांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले
हर घर तिरंगा अभियानास चांगला प्रतिसाद
By MahaTimes ऑनलाइन |
जिल्हाभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. १५ ऑगस्ट रोजी सर्वच शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालये तसेच खासगी आस्थापना व गृहसंकुलांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रमही राबवले गेले. यंदाच्या या महोत्सवात ‘घरोघरी तिरंगा’ या मोहिमेमुळे रस्तो रस्ती, प्रत्येक वस्तीत, इमारतींवर ध्वज फडकताना दिसले.
बंसल क्लासेस, बीड
देशभरात सर्वत्र मोठ्या उत्सहात आणि आनंदात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येतो आहे हे दृश्य अतिशय अभिमानास्पद असून मनाला सुखावणारे आहे. इतर सण-उत्सवाप्रमाणे देशात राष्ट्र सण साजरे करणे आपले आद्यकर्तव्य आहे. शिक्षणाचे मूल्य बीडमध्ये प्रगत व्हावं यासाठी आपण बंसल क्लासेसच्या माध्यमातून दमदार पाऊल उचलेले आहे. यामधून नक्कीच बीडमध्ये शैक्षणिक प्रगती झाल्या शिवाय राहणार नाही. शैक्षणिक प्रगती बरोबरच मुलांमध्ये नैतिक मूल्यांची पेरणी करणे देखील काळाची गरज आहे. असे प्रतिपादन डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी बंसल क्लासेसमध्ये १५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात केले.
देशभरात सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदोत्सवात पार पडत असताना बंसल क्लासेसमध्ये देखील पहिल्याच वर्षी आणि पहिल्यांदाच स्वातंत्र्यत्सोव मोठ्या थाटात संपन्न झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बंसल क्लासेसच्या सचिव डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी आपल्या शुभहस्ते ध्वजारोहण केले. उप शाखा व्यवस्थापक गणेश शेटे यांनी डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांचा स्वागतसतकार करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी आपले मनोगत भाषण केले. विद्यार्थी आणि पालक बंसल क्लासेसच्या शिक्षण पद्धतीवर समाधान व्यक्त करतांना ऐकावयास मिळत आहे. याबरोबरच बंसल क्लासेस आगामी काळात दर्जेदार शिक्षण देऊन बीडमध्ये शैक्षणिक यशाचं नक्कीच तोरण बांधणार असा विश्वास व्यक्त करत बंसल क्लासेसच्या सचिव डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बंसल क्लासेसचे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पवन गायकवाड यांनी केले.
गढी महाविद्यालय
जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर, गढी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निर्देशानुसार दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम व हर घर तिरंगा अभियान संपन्न झाले. दि 15 ऑगस्ट रोजी शिवाजीनगर, गढी. येथील सरपंच श्री अंकुशराव गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी रामदास मुंढे, गढीचे उपसरपंच मंगेश काबळे,डॉ. दहिफळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे सर, जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर गढीचे मुख्याध्यापक व्हि. पी. राठोड सर , उपमुख्याध्यापक सानप सर , पर्यवेक्षक गायकवाड सर हे उपस्थित होते. यावेळी गावातील मान्यवरांसह कनिष्ठ व वरिष्ठ प्राध्यापक शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. या भित्तीपत्रकासाठी प्रा. डॉ. संतोषकुमार यशवंतकर प्रा. हिरा पोटकुले प्रा.डॉ. रामहरी फाटक,प्रा. डॉ. राणी जाधव प्रा. डॉ. शिवाजी काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बडे सर व प्रा.डॉ.अयोध्या पवळ यांनी केले.आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. रामहरी फाटक यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सदाशिव सरकटे यांच्या सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,मुख्याध्यापक व्ही. पी.राठोड सर व त्यांचा शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी,परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
मिल्लिया महाविद्यालय
बीड येथील मिल्लिया महाविद्यालयात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या सचिव श्रीमती खान सबिहा बेगम यांच्या शुभहस्ते सकाळी 07: 15 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी मिल्लिया कला,विज्ञान आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य ङाॅ. मोहम्मद इलियास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस. एस. आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अब्दुल सत्तार, सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी -विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.