By MahaTimes ऑनलाइन |
बीड : पाटोदा-येथून जवळच असलेल्या बामदळवाडी जवळ टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी 6.45 वाजता पाटोदा शहराजवळ मांजरसुंबा- पाटोदा महामार्गावर घडली.
केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील रहिवासी असलेले रामराव कुटे हे पुण्याला खाजगी कंपनीत नौकरीला होते. गावाकडे लग्न असल्याने रात्री आपल्या कुटुंबासह पुण्याहुन गांवाकडे इंडीगो कारने निघाले होते. सकाळी पावणे सातच्या दरम्यान मांजरसुंब्याकडून येणार्या आयशर टेम्पो (क्रमांक एमएच-26 बीई 5945) आणि पाटोद्याजवळील बामदळ वस्ती जवळील पुलावर पुण्याहुन येणार्या इंडीगो गाडी (क्रमांक एम.एमच 12 केएन 8761) यांचा समोरासमोर भिषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले. त्यामध्ये रामहरी चिंतामण कुटे (वय 40), सुनिता रामहरी कुटे (वय 38,मुलगा), ऋषीकेश रामहरी कुटे (वय 19), मुलगी प्रियंका रामहरी कुटे (वय 16), आकाश रामहरी कुटे( वय 15 वर्ष) सर्व राहणार जिवाची वाडी ता. केज. रामहरी कुटे यांच्या मेव्हण्याची मुलगी राधीका सुग्रीव केदार (वय 9 वर्षं, रा. सारणी सांगवी ता.केज) हे सर्व जण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भयानक होता की मृतांच्या शरीराचा पार चेंदामेंदा झाला.
हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहने चक्काचूर झाली. अपघाताची माहिती मिळताच पाटोदा पोलीस ठाण्याचे ए.पी.आय.चंद्रकांत पवार यांनी क्रेनच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी मृतदेह दवाखान्यात दाखल केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आ. बाळासाहेब आजबे यांनी घटनास्थळी भेट दिली.