मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला
By MahaTimes ऑनलाइन |
नवी मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघातात निधन झालं. त्यांनी वयाच्या 55 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर आज (14 ऑगस्ट) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. एमजीएमचे मेडिकल संचालक डॉ. कुलदीप संकोत्रा यांनी सांगितलं की, “विनायक मेटे यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली होती. अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात हा पहाटे साडेपाच वाजता नव्हे तर “सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी त्यांच्या गाडीला अपघात झाला. सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा लगेच त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांचा ईसीजी काढण्यात आला, पण तो पूर्णपणे ब्लँक आला. त्यानंतर आम्ही त्यांना मृत घोषित केलं. रुग्णालयात दाखल करताना त्यांना पल्स नव्हते. याचाच अर्थ विनायक मेटे यांची नाडी तपासली असता नाडीदर शून्य होता. तर हार्टबिटही नव्हते. ईसीजीमध्ये विनायक मेटे यांचा रिपोर्ट फ्लॅट लाईनप्रमाणे आलेला होता. तर बिपी अर्थात ब्लड प्रेशरही नव्हतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विनायक मेटे यांच्या निधनाचं वृत्त कळल्यानंतर पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “आम्ही विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो.”
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : महाराष्ट्राच्या विकासकामात विनायक मेटेंनी नेहमी भाग घेतला. एक चांगला मित्र आम्ही गमावलाय. या अपघाताचं नेमकं कारण काय माहिती नाही. आपल्याला भारताला अपघातमुक्त करायचं आहे, हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली ठरेल.
शरद पवार : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं, “मराठवाड्यात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आणि कष्टानं स्वत:चं नेतृत्व उभं केलं, असे नेते म्हणून विनायक मेटेंची महाराष्ट्राला ओळख आहे. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न अशा सामाजिक प्रश्नांची त्यांना जाणीव होती.”
धनंजय मुंडे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मेटेंच्या निधनावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, “माझा आणि मेटेंचा परिचय नव्वदच्या दशकापासून आहे. मराठा आरक्षण, शिवस्मारकाचं काम, ऊसतोड कामगारांच्या प्रश्नी विधानपरिषदेत त्यांनी नेहमी आवाज बुलंद केला.”
जयदत्त क्षीरसागर : समाजामध्ये लढवय्या म्हणून ज्यांची ओळख होती असे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र माजी आमदार विनायक मेटे यांचे निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखदायक आहे,इतिहासात चांगले नेतृत्व काळाने ओढून नेले आहे,समाजकारण करत विविध क्षेत्रात त्यांनी यश संपादन केले होते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
डॉ.भारतभुषण क्षीरसागर : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष,अत्यंत संघर्षमय परिस्थितीतुन तयार झालेले नेतृत्व, मराठा समाजाला वेळोवेळी न्याय मिळावा यासाठी भुमिका मांडणारे विनायकराव मेटे साहेब यांचे आज सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघाती निधन झाल्याची बातमी अत्यंत दु:खद व धक्कादायक आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो या दु:खातुन त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याची शक्ती देवो….क्षीरसागर परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!
पंकजा मुंडे : दुर्दैवी अपघातात निधन झाल्याने विनायकराव मेटे सारख्या सतत चळवळीत काम करणार्या नेत्याला महाराष्ट्र मुकला, अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे, त्यांना 22-23 वर्ष पाहते आहे कुठल्याही पारिवारिक पार्श्वभूमी विना राजकारणात स्वतःच्या बुद्धी आणि कौशल्य च्या जीवावर उभा असणारा मराठा चळवळीतील नेता हरपला, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
आ. संदिप क्षीरसागर : जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या पातळीवर आपल्या समाजाचे आणि कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूराचे प्रश्न सातत्याने रस्त्यावर आणि विधीमंडळात मांडणारे माजी आ.विनायक मेटे साहेब यांचे आज सकाळी दुर्देवी अपघाती निधन झाल्याची बातमी कळाली. धक्काच बसला. काल-परवा गोरक्षनाथ टेकडीवर त्यांची अन माझी झालेली भेट हि अखेरची ठरेल असे स्वप्नातही वाटत नव्हते. म्हणत आ.संदिप क्षीरसागरांनी भावना व्यक्त केल्या आणि विनायक मेटेंना श्रध्दांजली वाहिली.
अमरसिंह पंडित : विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनामुळे मराठा समाज आणि महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विनायकरावांनी स्वतःच्या कर्तुत्वावर राज्यभर नावलौकिक मिळविला. मराठा आरक्षण आणि समाज्याच्या प्रश्नांवर त्यांनी संघर्ष केला. शिवाजीराव पंडित कुटुंबीयांनी माझ्या राजकीय जडघडणीत मोठी मदत केल्याचा उल्लेख ते नेहमी करतं, त्यांचे अकाली निधन वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी दिली आहे.
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक वर्षे सातत्याने भूमिका घेणारे संघर्षशील नेते शिवसंग्रामप्रमुख माजी आ.विनायक मेटे यांच्या निधनाने मराठा आरक्षणाचा महानायक हरपला आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत विनायक मेटे यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.