विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतला विविध विषयांचा आढावा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : भूतलावरील वृक्षसंपदेचे कमी झालेले प्रमाण चिंताजनक आहे. या पार्श्वभूमिवर निसर्गाचा असमतोल टाळण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम ही लोकचळवळ बनणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने स्वतःच्या वृक्षारोपण मोहिमांबरोबरच सामान्य नागरिकांना वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज येथे केले.

बीड जिल्ह्यातील विविध विषयांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा मिसकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बीड जिल्ह्यात विविध योजनांच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील वृक्षारोपणाची माहिती घेऊन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, अधिकाऱ्यांच्या हातात सामान्य माणसाच्या जीवनात बदल करण्याचे सामर्थ्य असते. नेहमीचा कामाचा व्याप असला तरी कायमस्वरूपी टिकणारे कार्य अधिकाऱ्यांच्या हातून घडावे. नैसर्गिक जैवविविधता जपण्यासाठी अधिकाऱ्यांनी संशोधन, अभ्यास करून काम करावे. वृक्षारोपण करताना झाडांच्या मूळ प्रजाती वाढतील, याकडे लक्ष द्यावे. वृक्षारोपण, प्लास्टीकबंदी यासारखे निसर्ग संवर्धन करणारे उपक्रमांवर काम करावे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची बीड जिल्ह्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार यांनी दिली. यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत जिल्ह्यात राबवण्यात येत असलेले विविध जनजागृती कार्यक्रम, वृक्षारोपण, मातोश्री पाणंद रस्ते, ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक विहिरी, ऊसतोड कामगार नोंदणी, थोडेसे मायबापसाठी पण… यासारखे विशेष उपक्रम, विशेष ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, आरोग्य शिबिरे, विरंगुळा केंद्रे आदिंची माहिती देण्यात आली. यावेळी हर घर तिरंगा उपक्रम, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे भूसंपादन याबरोबर अन्य बाबींचा आढावा घेण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक महिलेला प्रातिनिधीक स्वरूपात विशेष ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र वितरीत करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने जिल्ह्यात “हर घर तिरंगा” अभियान राबविले जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात वितरीत करण्यात येत असलेल्या नवीन राष्ट्रध्वजांचे अनावरण याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विक्रमादित्य लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याहस्ते करण्यात आले.