सकाळी शपथविधी, रात्री लगेच खातेवाटपही जाहीर
By MahaTimes ऑनलाइन |
मुंबई : महिन्याभराहून अधिक काळ प्रलंबित असलेला एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज पार पडला. राजभवनावर मंत्रीमंडळ विस्ताराचा हा शपथविधी झाला. पहिल्या टप्प्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
एकनाथ शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना शपथ देण्यात आली. भाजपकडून गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना शपथ देण्यात आली आहे.
एक महिन्यापासून एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा सुरू होती. आज अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या मंत्रीमंडळ विस्तारात मात्र संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या एकनाथ शिंदे गटातील दोन वादग्रस्त मंत्र्यांनी शपथ घेतल्याने टीका सुरू झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या मुलीच्या मृत्यूप्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद सोडावे लागले होते. त्यांना आज शपथ देण्यात आली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की राठोड यांना पोलिसांनी क्लीन चीट दिली होती. त्यामुळे त्यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र भाजप आमदार चित्रा वाघ यांनीच ट्विट करून टीका केली आहे. “पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे,” असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. तसेच कालच शिक्षक भरती परीक्षेमध्ये(टीईटी) सत्तार यांच्या मुलांची नावे आल्याने त्यांचे नाव चर्चेमध्ये आले होते. मात्र त्यांचाही आज समावेश करण्यात आला.
सकाळी शपथविधी, रात्री लगेच खातेवाटपही जाहीर
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामधील सरकारच्या मंत्रीमंडळाचं शपथविधी मंगळवारी सकाळी पार पडल्यानंतर रात्री लगेच खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्यानंतर खातेवाटपात नगरविकास खातं मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेच ठेवण्यात आलंय. तर गृह, अर्थ, महसूल अशी महत्वाची खाती मात्र भाजपनं आपल्याकडे ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.
कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?
एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री, नगरविकास
देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ
राधाकृष्ण विखे पाटील – महसूल
चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम
सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वन
मंगलप्रभात लोढा – विधी व न्याय
रविंद्र चव्हाण – गृहनिर्माण
उदय सामंत – उद्योग
दीपक केसरकर – पर्यावरण, पर्यटन
सुरेश खाडे – सामाजिक न्याय
दादा भुसे – कृषी
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
गिरीश महाजन – जलसंपदा
विजयकुमार गावित – आदिवासी विकास
अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास
अतुल सावे – आरोग्य
तानाजी सावंत – उच्च व तंत्रशिक्षण
संजय राठोड – ग्रामविकास
शंभुराज देसाई – उत्पादन शुल्क
संदीपान भुमरे – रोजगार हमी