बीडमध्ये संपर्कप्रमुख पाटील यांचे जंगी स्वागत
By MahaTimes ऑनलाइन | बीड
कोणी म्हणत असेल शिवसेना संकटात आहे. असे बिलकुल नाही, खरे संकट तेव्हा कोसळले होते जेव्हा शिवसेनाप्रमुख तमाम शिवसैनिकांना सोडून स्वर्गवासी झाले. हे असले पळपुटे, गद्दार निघून गेले म्हणजे संकट कोसळले असे नाही. अशा संकटाला गाडून पुढे चालणे हा शिवसेनेचा स्वभाव आहे.या संकटाला झुगारून आपण पुढे चालत राहू, जनतेच्या दरबारात न्याय मिळेल, निघून गेलेल्या गद्दारांना पश्चाताप होईल. राहिलेल्या १६ आमदारांचे १६० आमदार करणे हीच आपली जिद्द आहे असे बीड जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा संपर्कप्रमुख धोंडूदादा पाटील यांनी शिवसेना पदाधिका-यांना संबोधताना म्हटले.
बीड जिल्हा शिवसेनेच्या संपर्कप्रमुख पदी धोंडूदादा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर पहिल्यांदाच त्यांचे बीडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. आयोजित केलेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते. पुढे म्हणाले, गेलेले स्वार्थासाठी गेले आहेत. आता जाण्याचे कारण शोधत आहेत. मला चांगले आठवते १ एप्रिल १९९६ रोजी शिवसेना-भाजपाची लोकसभेसाठी युती झाली. त्या दिवशी मुंबईच्या रंगशारदामध्ये शिवसेना-भाजपा नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात ठाण्याची लोकसभेची जागा भाजपाकडे सुटली. तेव्हा तत्कालीन ठाण्याचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी आपण भाजपाचे काम करणार नसल्याचे निक्षुण सांगितले होते. स्व.आनंद दिघे यांना भाजपाचा मुळस्वभाव माहित होता आणि आज त्यांचे शिष्य म्हणून घेणारे भाजपाच्या मांडीला मांडी लावून शिवसेनेशी गद्दारी करत आहेत. शिवसेनेला न्याय नक्की मिळेल. शिवसेनाप्रमुखांचे आशिर्वाद घेवून आपण या सत्याच्या लढाईला निघालो आहोत. खोटारड्यांचा बुरखा आपण फाडणार आहोत. या भाषेत धोंडूदादा पाटील यांनी शिवसैनिकांना संबोधित केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख अनिल जगताप, आप्पासाहेब जाधव, माजी मंत्री बदामराव पंडित, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, किसान सेनेचे जिल्हासंघटक परमेश्वर सातपुते, उपजिल्हाप्रमुख बंडू पिंगळे, हनुमंत जगताप, शिवाजी कुलकर्णी, भाऊसाहेब लटपटे, सुशिल पिंगळे, जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, दिलीप गोरे, अरूण डाके, कालिदास नवले, रत्नाकर शिंदे, विनायक मुळे, सुनील सुरवसे, गोरख सिंगण, जयसिंग चुंगडे, सुनील अनभुले यांच्यासह जिल्हाभरातील तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मरेपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ राहू -अनिल जगताप
बीड जिल्ह्यात यापूर्वीही पदे भोगलेल्यांना गद्दारी केली. मात्र ज्यांनी गद्दारी केली त्यांचे अस्तित्व बीड जिल्ह्यातून नष्ट झाले आहे. गद्दारांना थारा न देणारा हा जिल्हा आहे. सत्तेचे लाभार्थी नसलेले आज ताठ मानाने पाय रोवून शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आम्ही स्वाभिमान आणि निष्ठा बाळगणारे आहोत. मरेपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ राहू, पुन्हा मोठ्या ताकदीने काम करू, आगामी निवडणुकांमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विजयाची भेट देवू असे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी म्हटले.
निवडून देणारे आपण सर्व शिवसेनाप्रमुखांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत -जाधव
नी गद्दारी केली, ते सर्व भविष्यात राजकीयदृष्टया संपलेले दिसतील. शिवसैनिक इमानदार आहेत, इमानदार शिवसैनिकांसमोरून जाण्याची या गद्दारांची लायकी नाही म्हणूनच गद्दार झालेले खंडोजी खोपडे आज तोंड लपवत आहेत. उज्वल भविष्य शिवसेनेचे असेल, गद्दारांना पुन्हा विजयश्री नाही, निवडून आलेले निघून गेले आहेत, निवडून देणारे आपण सर्व, शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीशी खंबीर आहोत, असे आप्पासाहेब जाधव यांनी ठणकावून सांगितले.