जुन्या पिढीतील ज्ञानवंत आणि धर्मशास्त्रातील आधारवड हरवला
पार्थीवावर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार
By MahaTimes ऑनलाइन | बीड
बीड येथील संत जनीजनार्दन यांचे तेरावे वंशज आणि थोरले पाटांगणाचे मठाधिपती वेदशास्त्रसंपन्न धुंडीराजशास्त्री देवीदासबुवा पाटांगणकर (82 वर्ष )यांंचे शनिवारी (दि. 16) रोजी सायंकाळी वृद्धपकाळाने निधन झाले. येथील अध्यात्मिक क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व होते. धुंडिराजशास्त्री यांच्यावर येथील खाजगी रु ग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता शहरातील अमरधाम स्मशानभुमीत पाटांगणकर महाराज यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मूळचे शिक्षक असणारे धुंडिराज महाराज हे वेदशास्त्रसंपन्न होते. आयुर्वेद या विषयात त्यांचा गाढा अभ्यास होता. दुर्धर आजारावर त्यांचे निदान अतिशय योग्य होते. संत जनीजनार्दन संस्थान थोरले पाटांगणचे ते प्रमुख होते. गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक काळापासून ते अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत होते. विद्यावाचस्पती म्हणून त्यांचा नावलौकिक होता. श्रीमद भागवत मुखोदगद असलेले धुंडिराज महाराज हे बीड जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्राचे वैभव होते. शहरात अनेक सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान होते. संस्कृत विषयात त्यांचा गाढा अभ्यास होता.
धुंडीराज पाटांगणकर हे जिल्हा परिषदेचे शिक्षक होते.वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. १९६८ मध्ये संत जनीजनार्दन संस्थानचे मठाधीपती म्हणून संस्थानचे काम पाहु लागले. कीर्तन, प्रवचन, धर्मशास्त्र , पंचांगाच्या माध्यमातून त्यांनी संस्थानचा प्रचार प्रसार करत राज्यभर शिष्य जोडले.
थोरल्या पाटांगणावरील चातुर्मास समाप्ती उत्सव ,संत जनीजनार्दन पुण्यतिथी कार्यक्रम ,अन्नदान त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाले. मागील तीन दिवसापासुन पाटांगणकर महाराज यांची तबीयत बिघडल्याने त्यांना बीडच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान शनिवारी दुपारी पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथे नेत असतांना वाटेतच शहागड जवळ त्यांची प्राण ज्योत मालवली. पाटांगणकर महाराज यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, नातवंडे, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे.
बीड अध्यात्मिक वैभवाला मुकले -जयदत्त क्षीरसागर
वे.शा.सं. धुंडीराज महाराज पाटांगणकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खदायक आहे. संत जनी जनार्दन यांच्या पादुका बीडमध्ये असण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. या मठाचे मठाधिपती होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोरले पाटांगण येथे दरवर्षी वार्षिकोत्सव साजरा होत असे. स्व. काकूंच्या कार्यकाळापासून त्यांचे आणि आमचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या निधनाने बीड शहर अध्यात्मिक वैभवाला मुकले असल्याची भावना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शोकसंदेशात मांडली आहे.
धनंजय मुंडे यांनी घेतले अंत्यदर्शन
बीड येथील संत जनीजनार्धन संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.धुंडीराजशास्त्री पाटांगणकर महाराज यांच्या पार्थिवाचे आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले. महाराजांनी अध्यात्माच्या मार्गाने शिकवलेली मानवतेची शिकवण सतत आम्हाला सन्मार्ग दाखवत राहील अशी भावना यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार सय्यद सलीम, नारायण शिंदे, कल्याण आखाडे, दादासाहेब मुंडे, प्रशांत चौरे आदी होते.