राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय ; सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिली माहिती
By MahaTimes ऑनलाइन | मुंबई
राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायत यांच्या निवडणुक कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. आयोगाचे सचिव संजय सावंत यांनी आज एका पत्राद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली आहे. सदर निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल. असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायत पंचायतीच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 8 जुलै रोजी जाहीर करण्यात आला होता.
मात्र सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली होती आणि 12 जुलै रोजी त्याची सुनावणी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला.
सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी 19 जुलै रोजी ठेवलेली आहे. या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने 8 जुलै रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला राज्यातील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात आला आहे.