आ.संदीप क्षीरसागर यांचे गौरवोद्गार; 500 झाडांचे रोपण
By MahaTimes ऑनलाइन | बीड
वृक्ष लागवडीतून पर्यावरणाचा समतोल साधत वैजिनाथ तांदळे यांनी वंजारवाडी चा विकास केला आहे. शासनाचे पुरस्कार मिळवणारे आदर्श गाव राज्यात अनेक आहेत. परंतू शासन दफ्तरातील त्या आदर्श गावांनाही हेवा वाटेल असा विकास बीड तालुक्यातील वंजारवाडी या गावचा झाला आहे. एवढे आदर्श गाव माझ्या बीड मतदार संघात असल्याचा मला अभीमान असल्याचे गौरवोद्गार आ. संदीप क्षीरसागर यांनी काढले. वंजारवाडी येथे 500 झाडांच्या वृक्ष लागवड कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.
बुधवारी (दि.6) वंजारवाडी येथे 500 झाडांच्या वृक्ष लागवड कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. 300 जांभळ व 200 फणसाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, महंत अमृत महाराज जोशी, माजी आमदार सुनिल धांडे, माजी आ. सय्यद सलीम, भाजप नेते सर्जेराव तांदळे, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, संपादक संतोष मानुरकर, जेलर विलास भोईटे, पोलिस निरिक्षक संतोष साबळे, बीडीओ सानप, गावचे प्रमुख वैजिनाथ तांदळे यांच्यासह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. संदीप क्षीरसागर म्हणाले, पदे अनेकांना मिळतात परंतू सर्वांनाच आपल्या गावाचा विकास करता येत नाही. विकास करण्यासाठी आवड असावी लागते. वैजिनाथनाना तांदळे आणि सर्जेरावतात्या तांदळे यांनी आपल्या गावाचा जो विकास केला आहे, त्याला बीड जिल्ह्याच नव्हे तर मराठवाड्यात तोड नाही. आज विकासकामे आणि वृक्ष लागवड, जलसंधारणाच्या कामांच्या माध्यमातून वंजारवाडी हे गाव मराठवाड्याचे महाबळेश्वर बनले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
गावकर्यांची एकी आणि विश्वासामुळेच विकास -सर्जेराव तांदळे
भाजप नेते सर्जेराव तांदळे यांनी गावकर्यांची एकी आणि विश्वासामुळे विकास करता आला. हा विकास एवढ्यावरच थांबणार नाही तर अगामी काळात वंजारवाडीला पर्यटन स्थळ बनवणार असल्याचे सांगीतले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांनी तांदळे बंधुंच्या कामाचे कौतुक करत वंजारवाडीने आदर्श निर्माण केला असल्याचे सांगीतले. वंजारवाडीचा आदर्श बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावाने घ्यावा, असे ते म्हणाले. संपादक संतोष मानुरकर यांनी तांदळे बंधू जेवढे कणखर तेवढेच संवेदनशील मनाचे आहेत. वंजारवाडीपेक्षा खुप कमी विकास झालेल्या गावांचा आदर्श गावाचे पुरस्कार मिळाले परंतू पर्यावरणाचा समतोल राखत विकास करणार्या वंजारवाडीला एकही पुरस्कार शासनाने दिला नाही, या बाबत खंत व्यक्त केली. जेलर विलास भोईटे यांनी अनेक गावे पाहिली परंतू निसर्गाचे एवढे वैभव लाभलेले आणि झाडांवर प्रेम करणारे वंजारवाडी सारखे गाव पाहीले नाही.यावेळी माजी आमदार सुनिल धांडे, सय्यद सलीम यांनी मनोगत व्यक्त करताना तांदळे बंधुंच्या विकासाभीमूख राजकारणाचे कौतुक केले. प्रत्येक गावाने वंजारवाडीचा आदर्श घ्यावा, असे ते म्हणाले.
प्रस्ताविकात गावचे प्रमुख वैजिनाथ तांदळे यांनी पुर्वीचे गाव आणि आजचे गाव यातील फरक सांगीतला. पुर्वी साधी बैलगाडी मंदीरापर्यंत येत नव्हती. लग्न, सप्ताह अशा छोट्या- मोठ्या कार्यक्रमासाठी पाणी वर आणता येत नसे. या परिस्थितीतून गावाला ईथपर्यंत आणण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला परंतू हार पत्करली नाही. गावकर्यांनी विश्वास टाकला, साथ दिली. यामुळेच गावाचा चेहरा- मोहरा बदलता आला, असे ते म्हणाले. यावेळी वंजारीवाडी येथील ग्रामस्थ, महिला, तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्ष लागवडीसाठी उलटले सारे गाव
वंजारवाडी येथे बुधवारी वृक्ष लागवड करण्यासाठी अक्षरश: सारे गाव रस्त्यावर आले. महिला, वयोवृध्द, जेष्ठ नागरीक असे एक हजारापेक्षा जास्त ग्रामस्थ वृक्ष लागवड मोहीमेत सहभागी झाले होते. यातून गावची एकी, सर्वजनिक कामातील ग्रामस्थांचा सहभाग आणि त्यांचा उत्साह दिसून आला. गावाला लाभलेले वैजिनाथ तांदळे, सर्जेराव तांदळे यांचे विकासाभीमूख नेतृत्व आणि गावकर्यांची त्यांना लाभलेली साथ यामुळेच आज वंजारवाडी हे गाव आदर्श गावाचे राज्यातील रोल मॉडेल बनले आहे.