सुधारित वेळा पत्रकान्वये होणार परीक्षा ; विद्यार्थी व शिक्षकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये
By MahaTimes ऑनलाइन | नाशिक
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र – 2022 अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 15 जुलै 2022 पासून घेण्यात येणार आहेत. आरोग्य विज्ञान विद्याशाखांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सर्व वर्षांच्या तसेच वैद्यकीय विद्याशाखेच्या अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाच्या परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या असून विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, उन्हाळी सत्र 2022 अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा समावेश आहे. पदवी अभ्यासक्रमांतर्गत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बी.एस्सी, फिजीओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात डॉक्टर ऑफ मेडिसिन (डीएम), एमडीएस, डिप्लोमा डेटिस्ट्री, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, डिप्लोमा आयुर्वेद, एम.एस्सी. नर्सिग, फिजिओथेरपी व एम.एस्सी. तील विविध विषयांचा समावेश आहे.
डॉ. पाठक पुढे म्हणाले की, दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा वगळता इतर सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा, वैद्यकीय विद्याशाखेच्या अतिविशेषोपचार अभ्यासक्रमांच्या परीक्षा व सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखांच्या पदवीच्या सर्व वर्षांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी 58999 इतके विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. प्रशासकीय कारणास्तव परीक्षा मंडळाच्या मान्यतेने विद्यापीठाने सदर परीक्षा पुढे ढकलून दि. 15 जुलै ते 04 ऑगस्ट 2022 या कालावधीत नियोजित करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
उन्हाळी सत्र 2022 परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी, पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षा दि. 18 मे ते 24 जून 2022 या कालावधीत यशस्वीरित्या घेण्यात आल्या आहेत. सदरील परीक्षेसाठी एकूण 2200 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. तसेच विद्यापीठाच्या हिवाळी – 2021 परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात आल्या होत्या. यामध्ये पहिल्या टप्प्यात पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी, पदविका व अतिविशेषोपचार अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा वगळता इतर सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यात आल्या.

तिसऱ्या टप्प्यात सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखांच्या पदवीच्या सर्व वर्षांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. हिवाळी – 2021 परीक्षा दि. 17 नोव्हेंबर 2021 ते 07 मे 2022 या कालावधीत घेण्यात आल्या. सदर परीक्षेसाठी एकत्रितरीत्या एकूण 90,000 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सदरील सर्व परीक्षांचे निकाल विद्यापीठाने अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे.
परीक्षासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाचे संकेतस्थळावर प्रसिध्द
उन्हाळी सत्र 2022 मधील परीक्षासंबंधीचे परिपत्रक क्र. 41/2022 विद्यापीठाचे www.muhs.ac.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. परीक्षेसंबंधी विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. परिपत्रकात नमूद केल्यानुसार सुधारित वेळा पत्रकान्वयेपरीक्षा घेण्यात येणार आहेत. याबाबत संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य व महाविद्यालय प्रमुखांनी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. उन्हाळी -2022 सत्रातील परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्नरत आहेत.
