जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांची माहिती
By MahaTimes ऑनलाइन | बीड
बीड जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांवर दुर्बिणीद्वारे टूर्प प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. प्रोस्टेट ग्रंथीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ही मोजक्याच जिल्हा रुग्णालयात होते. बीड जिल्हा रुग्णालयात दर्जेदार उपचारात सातत्यता ठेवत आणखी एकदा भर पडली आहे. ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.

या रुग्णाच्या प्रोस्टेड ग्रंथीला सूज त्यामुळे ही शस्त्रक्रिया करणे अत्यत गरजेचे होते. 23 जून 2022 रोजी लघवीच्या त्रासामुळे एक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी जवळपास 40 ते 50 हजार रुपये खर्च होतो. ही शस्त्रक्रिया प्रथमच दुर्बिणीद्वारे जिल्हा रुग्णालयात यशस्वीरित्या करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ. अभिषेक जाधव, डॉ. कुलकर्णी, डॉ. शेख, डॉ. वाघमारे, डॉ. माजेद, डॉ. केदार, डॉ. चव्हाण, परिचारीका विनोद धुले, सेवक माळी आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदभार घेतल्यानंतर डॉ. साबळे यांनी अनेक सुविधा दिल्या आहेत.
प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याने मूत्रमार्ग बंद होऊन त्रास सुरू होतो
पुरुषांमध्ये लघवीच्या पिशवीच्या खाली प्रोस्टेट ग्रंथी स्थित असते. त्यास पौरुष ग्रंथी असेही म्हणतात. पुरुषांच्या शरीरातून टेस्टॉस्टरॉन हे संप्रेरक स्त्रवत असते. त्याच्या प्रभावामुळे आणि जसजसे वय वाढते ही ग्रंथी मोठी होत जाते. लघवीच्या थैलीतून निघणारा मूत्रमार्ग (युरेथ्रा) प्रोस्टेट ग्रंथीच्या मधून जात असतो. ही ग्रंथी मोठी झाली की, मुत्रमार्गावर दाब येतो. त्यामुळे लघवीचा वेग कमी होतो. सोबतच लघवीच्या थैलीवर दाबदेखील येतो. एकूणच प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याने मूत्रमार्ग बंद होतो व त्रास सुरू होतात.
ही आहेत लक्षणे
प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे होणारा त्रास हा दोन कारणांनी असतो एक म्हणजे वाट अडकल्यामुळे आणि दुसरे म्हणजे लघवीच्या पिशवीवर अधिक ताण (प्रेशर) निर्माण झाल्यामुळे. अधिक ताण पडल्यामुळे वारंवार लघवीला जावे लागणे, लघवी रोखता न येणे, रात्रीस लघवीची वारंवारता वाढणे अशी लक्षणे दिसून येतात. वाट अडकल्यामुळे लघवी तुटून-तुटून होणे, कधी-कधी लघवी पूर्ण थांबून जाणे, लघवी झाल्यानंतरही थेंब थेंब लघवी होत राहणे, याशिवाय प्रोस्टेट वाढल्याने मूत्रपिंड निकामे होणे, हात-पाय- चेहऱ्यावर सुज येणे, रक्त जाणे, निरंतर खडे तयार होणे, लघवी पूर्णपणे थांबून जाणे अशा गुंतागुंत निर्माण होतात.
युरोलॉजिस्ट करतात रोगनिदान
प्रोस्टेट ग्रंथी चे निदान युरोलॉजिस्ट करीत असतात. वैद्यकीय परिक्षण आणि चाचण्यांच्या आधारे प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याचा त्रास सौम्य, मध्यम आणि तीव्र प्रकारात मोडला जातो. त्यासाठी सोनोग्राफी, लघवीच्या प्रवाहाच्या वेगाची चाचणी आणि त्याचा मूत्रपिंडावर पडणारा ताण, तसेच लघवीच्या थैलीचे प्रेशर तपासण्यासाठीची चाचणी अशा काही चाचण्या केल्या जातात. रक्तातील एक घटक पीएसए वाढले असल्यास प्रोस्टेट कर्करोगाची शक्यता असते. सामान्यतः पन्नासी ओलांडलेल्या पुरुषांनी याची चाचणी किमान एकदा तरी करवून घेतली पाहिजे.