शाळेत प्रवेशासाठी पालकांची लूट करताना कर्मचारी पकडले; छाप्यात 1.76 लाखाची रोकड जप्त
By MahaTimes ऑनलाइन | बीड
माजलगाव शहरातील नामांकित सिद्धेश्वर विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी संबंधित शाळेकडून पालकांची सर्रास लूट होत असल्याचे नेहमीच ऐकण्यात येत होते. प्रहार या सामाजिक संघटनेने वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित करीत शिक्षण विभागाकडे लिखित व तोंडी तक्रार केली होती. मात्र त्यांची तक्रार बेदखल करण्यात आली. आज आमदार सोळंकेंच्या ‘स्टिंग’ मुळे विभाग व पोलिसांना सोबत घेत केलेल्या स्टींग ऑपरेशन मध्ये प्रवेशासाठी पालकांची लूट करताना दोन कर्मचा-यांना पकडून त्यांच्या ताब्यातून 1 लाख 76 हजार रूपयाची रोकड जप्त केली तेंव्हा शाळेचा गोरखधंदा उजेडात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
माजलगाव शहरातील सिध्देश्वर शिक्षण संकुलात स्थानिक कार्यकारणीकडून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी 20 हजार रु पयांपेक्षा अधिक डोनेशन अवैधपणे घेतले जात असल्याची ओरड होती. प्रहार संघटनेचे गोपाल पैजने यांनी याबाबत शिक्षण विभागाकडे अनेक वेळा तक्रार करून देखील याची दखल घेतली नव्हती. दरम्यान, आज मंगळवार रोजी शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात पालकांना बोलावून विविध वर्गाच्या सेमी इंग्लिशच्या प्रवेशासाठी पालकांकडून फिस घेऊन प्रवेश देण्यात येत होते. अशी माहिती समजताच दुपारी बारा-साडेबारा वाजण्याच्या सुमारास दस्तुरखुद आ.प्रकाश सोळंके, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी मगळवारी स्टिंग ऑपरेशन करून दोन कर्मचा-यांना पालकांकडून नगदी पैसे घेतांना पकडून त्यांच्याकडून पोलिसांनी 1 लाख 76 हजार रु पये रोख रक्कम जप्त केली.
या प्रकाराने संस्थेत गेल्या कित्येक वर्षापासून चाललेला अनागोंदी कारभार समोर आला आहे. यावेळी शिक्षक ढगे, आदमने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दोन शिक्षक फरार झाल्याची माहिती आहे. दरम्यान, चार वाजेपर्यंत पालकांची जवाब नोंदविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.