माजलगाव सत्र न्यायालयाचा निकाल
By MahaTimes ऑनलाइन | बीड
शेतकरी भागवत बाबुराव गायके याचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी माजलगाव येथील सत्र न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवून जन्मठेप व 40 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हा फैसला मंगळवारी अपर सत्र न्यायाधीश श्री. एस.पी. देशमुख यांनी दिला.
संपूर्ण हकीगत अशी की, माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील शेतकरी मयत भागवत बाबुराव गायके (35) हे 20 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 6 वाजता त्यांच्या जांबळी नावाच्या शेतात कपाशीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. पाण्याचा बोअर सुरू करून येतो असे म्हणून गेलेला मुलगा बराच वेळ परत कसा नाही आला हे पहायला आई कौशल्याबाई गायके हया 8 वाजण्याच्या सुमारास शेतात गेल्या. तेव्हा मुलगा मयत भागवत हा पिल्लू डाके यांच्या शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. आरोपी बंडू उत्तम डाके व शिवा उत्तम डाके (रा. नित्रुड ता. माजलगाव) यांनी दगड व कोणत्या तरी शस्त्राने वार त्याचा खून करून केला होता.
या प्रकरणी कौशल्याबाई गायके यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात आरोपी बाळासाहेब उर्फ बंडू उत्तम डाके (वय 38), शिवाजी उत्तम डाके (वय 36), दिनकर किसन उर्फ लाला डाके (31) आणि दत्ता माणिक डाके (वय 37, सर्व रा. नित्रुड ता. माजलगाव) यांच्याविरूध्द गुरनं 253/2017 कलम 302, 120-ब, 34 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून दिंद्रुड पोलिसांनी माजलगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणाची सुनावणी अपर सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात सुरू होती. दरम्यान, प्रमुख साक्षीदार प्रताप महादेव बडे यांच्यासह 22 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. सदर प्रकरणाची सुनावणी अपर सत्र न्यायाधीश श्री. एसपी देशमुख यांच्या समोर झाली. सरकार पक्षाच्या वतीने दाखल साक्षी पुरावे व सहायक सरकारी वकील आर.ए.वाघमारे युक्तिवाद ग्राहय धरून आरोपी क्र. अनुक्रमे 1 व 2 आरोपी बाळासाहेब उर्फ बंडू उत्तम डाके, शिवाजी उत्तम डाके यांना दोषी ठरवून जन्मठेप व 40 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. तर आरोपी क्र. 3 दिनकर किसन उर्फ लाला डाके व आरोपी क्र. 4 दत्ता माणिक डाके यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील आर.ए.वाघमारे यांनी युक्तिवाद केला. तर अॅड. पी.एन. मस्कर, अॅड. एन.एस. पाटील यांनी त्यांना महत्त्वाची साथ दिली. त्याचप्रमाणे एड. डी.ए. वायकर, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सय्यद आसिफ व पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक व्ही.सी. जाधवर, पी.डी.नरवडे यांचेही महत्त्वाचे सहकार्य लाभले. या निकालाकडे संपूर्ण तालुक्याच्य नजरा लागून होत्या.