एकास पकडून ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला, अन्य दोघे-तिघेजण पळून जाण्यात यशस्वी
By MahaTimes ऑनलाइन | बीड
माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे जीपमधून आलेल्या एका व्यक्तीने त्याच्या जवळील पिस्तुलातून गोळीबार केला. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत एक तरुण जखमी झाला. संतप्त ग्रामस्थांनी जीपमध्ये बसून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन-चार जणांपैकी एकास पकडून चांगलाच चोप दिला. अन्य दोघे, तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले.

प्राप्त माहितीनुसार, तालखेड परिसरात काही तरुण उसतोडीचा हंगाम संपल्यानंतर तालखेड येथे गावी आल्यानंतर नृत्य करून आनंदोत्सव साजरा करत होते. दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास परराज्यातील तीन-चार जण जीप मध्ये बसून आले. त्यांनी जीपमधून उतररून नृत्य करणाऱ्या तरु णांना मारहाण केली. आणि दहशत माजविण्याच्या हेतूने आपल्या जवळील पिस्टल ने गोळीबार केला. या घटनेत साहेबराव जाधव (वय 35) हे गोली लागून गंभीर जखमी झाले. तरूणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ग्रामस्थांनी अचानक गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या जीप ( एम. एच. 42 एच 7084 ) समोर ट्रॅक्टर आडवा लावून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक जण जमावाच्या तावडीत सापडला. ग्रामस्थांनी संतोष गायकवाड (रा. केसापुरी कॅम्प ) पकडून त्याचे कपडे काढून चांगलाच चोप दिला व त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. जिल्ह्यात आधीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असतांना तालखेड मध्ये गोळीबार, एक जखमी या घटनेने खळबळ उडाली आहे.
या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीने प्रसारमाध्यमांना सांगितले की, तो सायंकाळी तालखेडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात होता. दरम्यान एका व्यक्तीने त्याच्या जवळील पिस्तुलातून गोळीबार केला. जीप मधून पोलिसांनी एक पिस्टल, दोन तलवार सदृश हत्यारे, एक बरचा आदी ताब्यात घेतली. सदरचे वृत्त लिहीपर्यंत माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
अॅट्रॉसिटीसह 307 गुन्हा दाखल
उसतोडीचा हंगाम संपल्यानंतर तालखेड येथे गावी आल्यानंतर सखाराम जाधवसह इतर ऊसतोड मजूर सोमवारी दुपारी जल्लोष करत होते. यावेळी संतोष गायकवाड सह अन्य 4 साथीदार स्कार्पिओ मध्ये आले होते. गाडीला साईड दिली नाही या क्षुल्लक कारणावरून पाच तरुणांनी एका युवकावर गोळीबार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यातील आरोपी विरोधात सोमवारी रात्री उशिरा अॅट्रॉसिटीसह 307 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील संतोष गायकवाड यास मारहाण करून त्याच्यासह दिलीप शिंदे यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. इतर तिघांचा कसून शोध सुरू होता. आज सकाळी या प्रकरणातील फरार तिघांना बीडच्या एलसीबीने जालना येथून ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले .
