जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल; प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. हेमंत महाजन यांनी सुनावली शिक्षा
By MahaTimes ऑनलाइन | बीड
लहान बालकाचा नदीत बुडवुन निर्दयीपणे खून केल्याप्रकरणी आरोपीस महिलेस 302भा.द.वि. प्रमाणे दोषी ठरवुन 10 वर्षाची कारावासाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री हेमंत महाजन साहेब यांनी सुनावली. शारदा श्रीराम शिंदे (रा. शाहुनगर, बीड) असे सजा सुनावलेल्या महिलेचे नाव आहे. या बहुचर्चित खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागुन होते.

सदर प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी की, फिर्यादी अनिता विष्णु देवगुडे ही 15 वर्षा पूर्वी गढी कारखाण्यावर काम करत असताना श्रीराम शिंदे यांच्याशी ओळख होवून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. कालांतराने फिर्यादीचे लग्न विष्णु देवगुडे यांच्याशी झाले. परंतु तो भोळसर असल्याने श्रीराम शिंदे हा तिस पैशाची मदत करत असे परंतु श्रीराम शिंदे यांची पत्नी शारदा हीस ते आवडत नसे व वारंवार पती बाहेर गेल्यास सतत अनिता हीस फोन करून भांडत असे.
आरोपी शारदा ने तिच्या पतीच्या व फिर्यादीच्या अनैतिक संबंधाचा राग मनात धरून फिर्यादीचा मुलगा सार्थक विष्णु देवगुडे वय 3 वर्षे 6 महिने याचा खुन करण्यासाठी फिर्यादीचे घराचा दरवाजा हलवुन कडी उघडुन घरामध्ये प्रवेश केला घरात झोपलेल्या सार्थक यास त्याचे पालकांचे रखवालीमधुन घेवुन जावुन त्यास धानोरा रोड बीड ते अंकुश नगर बीड जाणारे रोड वरील पुलाजवळील करपरा नदीचे पात्रातील पाण्यामध्ये बुडवून त्याचा खुन केला व पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे प्रेत करपरा नदीचे पात्रामध्ये फेकुन दिले.
या खुनाच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. याप्रकरणी मृत बालकाची आई फिर्यादी अनिता विष्णु देवगुडे हिच्या तक्रारीवरून आरोपी शारदा उर्फ शामल श्रीराम शिंदे हिच्या विरु ध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा र. नं. 276/2019 कलम 302,363,364,449,201 भा.द.वि प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक ए. एम. शेख, यांनी सदर प्रकरणात तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.
सदर प्रकरणाची सुनावणी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बीड यांचे न्यायालयात झाली. सदर आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकुण आकरा साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात साक्षीदारांची साक्ष व घटनास्थळ पंपनामा पुराव्याचे अवलोकन करून व सहायक सरकारी वकील अॅड. अजय तांदळे यांचा युक्तीवाद ग्राहय धरु न मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, हेमंत महाजन साहेब यांनी आरोपी शारदा शिंदे हिस कलम 302भा.द.वी अन्वये दहा वर्षाची सश्रम कारावास व दंड, 304 नुसार दहा वर्षाची सश्रम कारावास व 500/- रू. दंड, कलम 450 व 364 अन्वये 10 वर्ष कारावास व 500/- रू. दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणा मध्ये सरकारी पक्षा तर्फे अॅड. अजय तांदळे व अॅड. बी. एस. राख यांनी काम पाहिले तसेच या प्रकरणी पैरवी अधिकारी श्री. इंगळे, एपीएसआय यांनी सहकार्य केले.