होमिओपॅथी संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचा समारोप
By MahaTimes ऑनलाइन | औरंगाबाद
महाराष्ट्रा सारख्या राज्यात होमिओपॅथी डॉक्टरांच्या मागण्या अद्यापही प्रलंबितच आहेत. आपण या होमिओपॅथीच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली. कोविड सारख्या महामारीचा सामना करताना जगभरात होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी तोडीस तोड काम करून रूग्णांना जीवदान देण्याचं काम केलं. आर्सनिक आल्बम सारख्या औषधीचा तर सर्वोत्कृष्ट नमुना ठरला. असेही ते म्हणाले.
होमिओपॅथी मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया या होमिओपॅथीच्या राष्ट्रीय संघटनेचे दोन दिवसीय 22 वे ऑल इंडिया होमिओपॅथीक सॉयंटिफिक सेमिनार औरंगाबाद येथील एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात उत्साहात पार पडले. या सेमिनारचा समारोप रविवारी (दि.15) सायंकाळी झाला. यावेळी माजी मंत्री क्षीरसागर बोलत होते. या प्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामजी सिंग, सेक्रेटरी जनरल डॉ. पीयूष जोशी, कोलकाता येथील डॉ. अल्ताफ हुसेन, अभिजित चॅटर्जी, प्रशांत शहा, कांचन देसरडा, व्ही. आर. कवीश्वर,पी. वाय. कुलकर्णी, प्रताप भोसले, किशोर मालोकर नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. अमित भस्मे यांची प्रमुख उपस्थिती होते.
पुढे बोलताना माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले, की कोविड सारख्या महामारीचा काळ संपूर्ण जगाने अनुभवला. त्सुनामीपेक्षाही भयानक स्थितीत आलेल्या कोविडने संपूर्ण जगाला विळख्यात घेतले. त्यावेळी ॲलोपॅथीच नव्हे तर आयुर्वेदा, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी सारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा कस लागला. यात सगळ्यात तोडीस तोड म्हणून होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी भरीव योगदान दिले. कोरोनाने अनेकांचे बळी घेतले. कोविड सारख्या आजारांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचे मोठे आव्हान आहे. होमिओपॅथीला आज जागतिक स्तरावर महत्व प्राप्त होत चालले आहे.
लोकनेत्या दिवंगत माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मागील तीस- पस्तीस वर्षांपूर्वी राज्यात सर्वप्रथम बीडमधून होमिओपॅथीचा डिग्री कोर्स सुरू केला. बीडच्या सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी कॉलेजमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज संपूर्ण राज्य आणि देशभर कार्यरत झाले आहेत. मराठवाड्यातील बीड सारख्या कायम दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या जिल्ह्यातून होमिओपॅथीचं रोपटं लावलं. त्याने आज नावलौकीक केला आहे. होमिओपॅथी डॉक्टरांना अन्य राज्यांप्रमाणे सन्मान मिळावा, यासाठी होमिओपॅथीच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. अरूण भस्मे यांनी प्रास्ताविक केले. अन्य राज्यांप्रमाणे संधी मिळावी, असेही ते म्हणाले. यावेळी सात ठरावही एकमुखाने मंजूर करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या सेमिनारमध्ये देशभरातून आलेल्या सुमारे चाळीसहून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांनी व्याख्याने देत होमिओपॅथी उपचार पद्धती सर्वच आजारांवर किती प्रभावी आहे याची सविस्तर माहिती दिली. तसेच होमिओपॅथीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी डॉक्टरांना देशभरातून आलेल्या नामांकीत डॉक्टरांनी मार्गदर्शन केले, अशी माहिती डॉ. अरूण भस्मे यांनी दिली.
याप्रसंगी संघटेनेचे अध्यक्ष रामजी सिंग यांनी दिवंगत लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांनी होमिओपॅथी कॉलेजसाठी 1992-93 मध्ये केंद्र सरकारकडे कसा पाठपुरावा केला आणि मान्यता मिळवली, तसेच राज्यातील पहिले काँलेज बीडला आणले, याचे आपण साक्षीदार असल्याचे सांगीतले. होमिओपॅथीची ताकद वाढत चालल्याचेही ते म्हणाले. यावेळी संघटनेचे डॉ. बाळासाहेब पवार यांचेही भाषण झाले. राज्यात सुमारे 75 हजार होमिओपॅथी डॉक्टर असून त्यांना शासनाकडून संधी मिळण्याची मागणी केली.
यात होमिओपॅथी डॉक्टरांना केंद्राच्या धोरणाप्रमाणे तीस टक्के पदांवर वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त करावे. राज्यात होमिओपॅथी संचालनालय सुरू करून संचालकांची नियुक्ती करावी. होमिओपॅथी कॉलेजला केंद्र सरकारकडून बिल्डिंग अर्थसाह्य व खर्चासाठी आर्थिक तरतूद म्हणून तीस लाख रूपयांचा निधी पूर्ववत सुरू करण्यात यावा. अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही प्रशिक्षण भत्ता मिळावा, पद्व्युत्तर अभ्यासक्रमाच्या सात विषयांना मिळाली असली तरी उर्वरीत विषयांना केंद्र सरकारने मंजुरी द्यावी. आयुष्यमान भारत व एनआरएचएम या केंद्राच्या योजनांमध्ये होमिओपॅथीला समसमान दर्जा मिळावी अशा मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले.