अखंड हरिनाम सोहळयाची काल्याच्या कीर्तनाने सांगता, वारकरी संप्रदाय समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम – क्षीरसागर
By MahaTimes ऑनलाइन | बीड
प्रपंचात माणसे नुसती वणवण करतात भोग भोगूनही शांत होत नाहीत त्यांची वासना मरत नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा जन्माला यावे लागते. पण, परमार्थ महाधन आहे. जीवाने आपल्या इंद्रियांना आवरून परमार्थाकडे लावल्यास तो सुखरूप असलेला सुखच देईल तिथं शांतिचा स्पर्श आहे म्हणूनच परमार्थ हे समृद्ध सुख आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. त्रिविक्रमानंद शास्त्री इंदुवासिनीगड पिंपळनेर यांनी काल्याच्या कीर्तन प्रसंगी केले.
येथील श्रीसंत भगवान बाबा व संत वामन भाऊ प्रतिष्ठान इंद्रप्रस्थ कॉलनी येथे संत वामनभाऊ महाराज व संत भगवान बाबा, संत तुकाराम महाराज, विठ्ठल रु क्मिणी आणि हनुमान देवता मुर्ती प्राणप्रतिष्ठापनाच्या 10 व्या वर्धापनिदनानिमित्त, ह.भ.प. विठ्ठल महाराज श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड यांच्या प्रेरणेने, आशीर्वादाने व संत वामनभाऊ व भगवान बाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ सानप यांच्या आयोजनातून संपन्न झालेल्या अखंड हरिनाम सोहळयाची सांगता ह.भ.प. त्रिविक्र मानंदशास्त्री यांच्य काल्याच्या कीर्तनाने झाली. आपल्या अभंग निरूपणातून बोलतांना ह.भ.प. त्रिविक्र मानंद शास्त्री म्हणाले की, शरीर चालविण्यासाठी इंद्रिये लागतात त्यास गायी म्हटले आहे. आपण इंद्रियाच्या आश्रयाने राहतो. इंद्रियांचा स्वभाव विषय सेवन आहे. विषय सेवनाने कोणी तृप्त झाला नाही त्यातच तो शांत नहोता त्यास शीण येतो. शरीर व त्यासंबंधी पसार्यात फिरत राहणे यासच वणवण म्हणतात. यात केवळ दु:ख आहे पण अपेक्षा मात्र सुखाची केली जाते. खरे सुख घ्यायचे असेल तर इंद्रिये संयमित असून त्यांस परमार्थाचा आग्रह हवा आहे.
देवानेच माणसाला इंद्रिये हे त्यांच्या प्राप्ती करताच दिले आहेत म्हणून त्याने ते त्यास जोडावे म्हणजे त्याचे जीवपण नाहिसे होऊन संसार जन्ममरण ही परंपरा संपेल व तो सुखी होईल. देव एकटाच आहे त्याशिवाय दुसरे कोणी नाही. तो सुखरूप आहे म्हणून आपल्या संपूर्ण देहाला देवाकडे लावावे. अनेक जन्मापासून जीवाचा शिवाचा खेळ चालला आहे. जीव मायेत गुरफटलेला आहे. मी, माझेपणा चकरात सापडला म्हणून त्याची खेळण्याची ताकद कमी झाली, देहतादात्म्याचे ओझे झाले. कुटुबांची सेवा करता करता मेटाकुटीला आला म्हणून या धकाधकीतून बाहेर पडण्यासाठी जीवाने देवाच्या चरणाकडे धाव घ्यावी म्हणजे त्याचे जीवपण नाहिसे होऊन तो सुखी होईल म्हणून परमार्थ हे समृद्ध सुख असे ते यावेळी म्हणाले.
वारकरी संप्रदाय समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम -जयदत्त क्षीरसागर
याप्रसंगी विशेष अतिथी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, वारकरी संप्रदाय हा समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून संप्रदायाने आपली पताका अटकेपार नेली आहे. संत वामनभाऊ व भगवान बाबा प्रतिष्ठानही अध्यात्मिक कार्य जोमाने करत आहे. संतांनी समाज जीवनास योग्य दिशांनी वाटचाल करण्याचे ज्ञान दिलेले आहे. मी या प्रतिष्ठानास सर्वेतोपरी सहकार्य करेन अशी त्यांनी ग्वाही दिली.
यावेळी जेष्ठ नेत्या सुशिलाताई मोराळे, अरूण नाना डाके, मा जि प अध्यक्ष मीराताई गांधले, रामहरी रसाळ गुरूजी, आयोजक डॉ राजेद्रभाऊ सानप, अनंत घिगे साहेब, अॅड चंपावती काकी पानसंबळ, माजी नगरसेवक सुहास पाटील, माजी. नगरसेवक अॅड. महेश गर्जे, अंगद मोरे, डॉ.श्रीहरि लहाने, माजी जि. प.सदस्य मधुकर ढाकणे, नारायण नागरे, डॉ पी सी तांबडे, धनंजय सानप, प्रवीण सानप, कुंडलिक खेडकर,अॅड.संतोष वारे, पुष्पाताई पांगारकर, अशोक जाथव, सुमित्राताई खेडकर, दादाहरी गीते, अरूण बावणे, नागरगोजे सर, एम डी पंचाळ, राजेंद्र घोलप, गणेश शेळके आदिंची उपस्थिती होती.
या काल्याच्या कीर्तनात गायक म्हणून श्रीराम सानप, किशन माने, बाबासाहेब शिंदे, भास्कर जायभाये, श्रीमंतबापु तांदळे, राम कृष्ण मिसाळ, नवनाथ जायभाये, नामदेव मुंडे, सुभाष बटुळे, वैजीनाथ सानप, अंकुश भालेराव, ज्ञानदेव आगलावे, मृदंग वादक म्हणून ह.भ.प.अक्षय घोलप व ज्ञानेश्वर महाराज तांदळे आणि असंख्य भाविक भक्त उपस्थित होते.