होमिओपॅथी संघटनेच्या राष्ट्रीय सेमिनारचे औरंगाबादेत उद्घाटन
By MahaTimes ऑनलाइन | औरंगाबाद
कोविड काळात होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी बजावलेली भूमिका ॲलोपॅथीच्या तोडीस तोड ठरली. देशभर नव्हे तर जगभरात होमिओपॅथीचं आरोग्य क्षेत्रात मोठं योगदान आहे. कुठल्याही आजारावर होमिओपॅथी ही उपचार पद्धती प्रभावी आहे. या होमिओपॅथीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजाश्रय दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात ही राजाश्रय मिळावा, अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शनिवारी (दि.14) व्यक्त केली.

होमिओपॅथी मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया या होमिओपॅथीच्या राष्ट्रीय संघटनेचे 22 वे ऑल इंडिया होमिओपॅथीक सायंटिफिक सेमिनारचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. येथील एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे, आमदार विक्रम काळे , संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामजी सिंग, जनरल सेक्रेटरी डॉ. पीयूष जोशी, कोलकाता येथील डॉ. अल्ताफ हुसेन यांची प्रमुख उपस्थिती होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानेटकर यांचे ऑनलाइन भाषण झाले. दोन दिवस चालणाऱ्या या सेमिनारमध्ये महाराष्ट्रासह देशभरातून सुमारे तीन हजारांवर डॉक्टर्स, विदयार्थी सहभागी झाले आहेत.

पुढे बोलताना डॉ. कराड म्हणाले, की देशभरात होमिओपॅथीची 278 एवढे होमिओपॅथी कॉलेज आहेत. यातील एक तृतियांश एवढे कॉलेज केवळ महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात होमिओपॅथी चळवळ सुरू करण्याचे व रुजविण्याचे काम मराठवाड्यातून सुरू झाले. दिवंगत माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांनी बीड, जालना येथून सत्तरच्या दशकात ही चळवळ हाती घेतली. बीडमध्ये सुरू केलेले सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी कॉलेज आज एक प्रतिष्ठित कॉलेज म्हणून गणले जाते. तेथून पदवीधर, पीएचडीधारक विद्यार्थी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. या कॉलेजने आपला दर्जा वाढविण्याचे काम केले आहे. जालना व औरंगाबादेतही मोठ्या प्रमाणावर होमिओपॅथीचं काम आहे. आपण 1977 पासून होमिओपॅथी चळवळीशी जोडल्या गेलो. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने होमिओपॅथीला राजाश्रय दिला. त्यानुसार गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक सारख्या राज्यांनी राजाश्रय दिला. परंतू, महाराष्ट्रात अद्यापही हे काम झाले नाही.

कोविडच्या काळात होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी बजावलेली भूमिका वाखाणण्याजोगी आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काम करताना आपण अर्थ खात्याचे राज्यमंत्री म्हणून राज्यात होमिओपॅथीला राज्याश्रय मिळण्यासाठी संघटनेच्या सोबत राहू. अर्थखात्याकडून बजेट बनविताना प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सोबतच आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी कॉलेज वाढावेत. तंत्रज्ञान, विज्ञान प्रगत व्हावं असाच पंतप्रधानांचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे बजेट मध्ये तरतूद करण्याला आपण कमी पडणार नाही. राज्यात राजाश्रय मिळतानाच जिल्हा रूग्णालय, आरोग्य उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून होमिओपथी डॉक्टरांना नियुक्ती मिळावी यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.
राजाश्रय मिळण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ : राजेश टोपे
राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संघटनेचे डॉ.बाळासाहेब पवार आणि डॉ. अरुण भस्मे यांच्या मागण्या रास्त असून त्या पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट केले. कोविडचे उच्चाटन होमिओपॅथीक डॉक्टरांच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हते, असे सांगून टोपे म्हणाले, की होमिओपॅथीला राजाश्रय मिळण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. जिल्हा रूग्णालयात आयुष कक्षांतंर्गत होमिओपॅथी, युनानी व आयुर्वेद डॉक्टरांना स्थान देण्यात येईल, त्यांना कंत्राटी पद्धतीने का होत नाही. परंतू, न्याय दिला जाईल. त्यामाध्यमातून नर्सेस, मदतनीस यांची भरती करण्यात येईल. किमान शंभर खाटांचं हॉस्पिटल असलेल्या ठिकाणी हे सुरू करण्यात येईल.
संघटनेचे माजी अध्यक्ष रामजी सिंग यांनी आयुष विभागाचा राज्याचा वाटा चाळीस टक्के राज्य सरकार देत नाही. त्यामुळे केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून प्राप्त झालेला साठ टक्के निधी खर्च होत नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्याचीही चौकशी करण्याचे आश्वासन टोपे यांनी दिले. केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी आयुष मंत्र्यांशी चर्चा घडवून राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी टोपेंनी केली.

याप्रसंगी संघटनेचे माजी अध्यक्ष रामजी सिंग, डॉ. अरूण भस्मे, बाळासाहेब पवार आदींची प्रभावी भाषणे झाली. कार्यक्रमात बीडचे डॉ.एस. पी. लड्डा यांच्या पुस्तकाचे तसेच संघटनेच्या स्मरणिकेचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ होमिओपॅथी कॉलेज, बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी कॉलेज आणि एचएमएआय महाराष्ट्र शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय चर्चासत्राचे सूत्रसंचालन श्रीवत्सन यांनी केले तर मुरलीधर इडोळे यांनी आभार मानले.
काकुंची प्रेरणा अन् भस्मेंचे नेतृत्व
मराठवाड्यात होमिओपॅथी चळवळ रूजण्यासाठी दिवंगत खासदार केशरकाकू क्षीरसागर यांनी प्रयत्न केले. बीड नंतर जालन्यात यश मिळाले तर औरंगाबादेत वाय.जी.खेडकर यांनी कॉलेज सुरू केले. होमिओपॅथीला राजाश्रय मिळण्यासाठी बीडचे डॉ. अरूण भस्मे, औरंगाबादचे दिवंगत एस.एम. देसरडा, डॉ. पी. वाय. कुलकर्णी यांनी चळवळीचे नेतृत्व केल्याने ती फोफावत गेली. त्यामुळे पुण्याला होणारी ही परिषद आपण औरंगाबादेत व्हावी, अशी आग्रही भूमिका घेतल्याचे डॉ. भागवत कराड यांनी स्पष्ट केले.
