मृतांत तीन सख्खे भाऊ व एका पुतण्याचा समावेश
By MahaTimes ऑनलाइन | बीड
आष्टी तालुक्यातील धामणगावजवळ कार दरीत कोसळल्याने बीड शहरातील टेकवाणी कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला. बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांत तीन सख्खे भाऊ व एका पुतण्याचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील प्रसिद्ध टेकवाणी कुटुंबातील सदस्य आपल्या व्यवसायानिमित्त अहमदनगरकडे जात होते. बुधवारी रात्री त्यांची कार (एमएच 23 एएस 4025 ) बीड अहमदनगर रस्त्यावरील धामणगाव (ता. आष्टी) घाटातून जात होती. यादरम्यान कार चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन 60 फुट खोल दरीत कोसळली.
हा अपघात इतका भीषण होता की खड्ड्यात पडून कारचा पूर्ण चक्काचूर झाला. तर कारमधील सतीश पंजुमल टेकवाणी (55), सुनील पंजुमल टेकवाणी (48), शंकर पंजुमल टेकवाणी (46), लखन टेकवाणी (22) यांचा जागीच मृत्यू झाला. तर नीरज शंकर टेकवानी (20) हा जखमी झाला.
या अपघाताची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी रवी देशमाने, जमादार लुईस पवार, पोलीस नाईक प्रल्हाद देवडे यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी मृतांना कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून मृत घोषित केले.. टेकवाणी कुटुंब हे बीड शहरातील प्रसिद्ध व्यापारी असून एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. शहरात शोककळा पसरली आहे.