महावितरणचे ग्राहकांना आवाहन मेसेज प्रकरणी लातूर पोलीसात तक्रार दाखल
By MahaTimes ऑनलाइन | लातूर
नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उददेशाने काही समाजकंटकाकडून वीज ग्राहकांना मोबाईल वर बनावट टेक्स्ट मेसेज पाठवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची बाब महावितरणच्या निदर्शनास आली आहे. त्याबाबत ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या सुचनेनुसार लातूर विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सामसे यांनी त्याबाबत शुक्रवारी पोलीस अधिक्षक लातूर यांच्या कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे.
वस्तुत: महावितरणकडून भारतीय विदयुत कायदा 2003 च्या कलम 56 नुसार ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येणाऱ्या नोटीसेसचा मजकूर हा विस्तृत स्वरुपाचा असून महावितरण कधीही कुण्याही वीज ग्राहकाला कुण्याही अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यासाठी सुचवत नाही, थकित किंवा चालू महिन्याचे वीजबिल भरण्यासंदर्भात अधिकृत संकेत स्थळ अथवा नजीकच्या कार्यालयात जावून बिलाचा भरणा करण्यासंदर्भांत आवाहन करीत असते. त्यामुळे वीज ग्राहकांनी मोबाईल वर येणाऱ्या फसव्या व बनावट मेसेजेसना बळी पडू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
सावधान..! अशा आशयाचा बनावट मेसेज
‘प्रिय ग्राहक, मागील महिन्याचे आपले विजेचे बिल भरण्यात न आल्याने वीज कार्यालयाकडून आज रात्री 9:30 वाजता आपला वीज पुरवठा खंडित करण्यात येईल. त्यासाठी तत्काळ 8389024355 या क्रमांकावर विद्युत अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. अशा आशयाचा बनावट मेसेज पाठविण्यात येत आहे.’