नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा – मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल नढे
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
मुद्रांक शुल्काच्या (स्टैंप ड्यूटी) तुटीच्या रक्कमेवर आकारण्यात येणाऱ्या दंडात (फाइन) राज्य सरकारने आता येत्या 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत (आठ महिने ) सवलत दिली असल्याची माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल नढे यांनी सोमवारी (ता. 25) दिली.
याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने 1 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. श्री. अनिल नढे म्हणाले की, आतापर्यंत सन 1994-95, 1997, 1998, 2004 आणि 2019 अशा पाचवेळा मुद्रांक शुल्क माफी योजना राबविण्यात आल्या आहेत. परंतु नव्याने आलेली माफी योजना ही मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय असलेल्या दंडावर आधारित आहे. अशा प्रकारची ही पहिलीच सवलत योजना आहे. यासाठी मुद्रांक शुल्काच्या त्रुटीच्या भागावरील शास्ती कमी करण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
मुद्रांक – अभय योजना अंतर्गत ही माफी योजना मुद्रांक तुट व शास्तीची वसूली सुरू असलेल्या प्रकरणांना लागू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे विभागात सुरू असलेली दंड प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे कमी करून मुद्रांक व नोंदणी विभागाचा या कामकाजात जाणारा अधिकचा वेळ कमी करणे व न्यायालयीन प्रकरणे कमी करणे हा या योजनेचा मुख्य हेतू असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल नढे यांनी सांगितले.
विशेष कक्ष स्थापन करणार
या सवलत योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा सहनिबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्याचा आदेश राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हार्डिकर यांनी दिला आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ही श्री. अनिल नढे यांनी केले आहे.
योजनेचे स्वरुप
सदर योजना ही अधिसुचने सोबतच्या परिशिष्ट मध्ये नमूद दस्तऐवजांवर उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची -1 च्या अनुच्छेदांतर्गत आकारणी योग्य असलेल्या मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर उक्त अधिनियमाच्या कलम 31 च्या पोट – कलम 4 च्या खंड ( दोन ) , कलम 32 अ च्या पोट – कलम 2 आणि पोट – कलम 4 च्या पहिल्या परंतुकानुसार तसेच कलम 39 च्या पोट कलम 1 च्या खंड ( ख ) च्या तरतुदीनुसार लागू होणारी एकूण शास्ती ही अटी व शर्तीच्या अधीन राहून 10 % पर्यंत कमी केली आहे आणि दि. 1 एप्रिल 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीसाठी असून दि. 1 ऑगस्ट 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीसाठी 50 % कमी केली आहे. रोजी किंवा त्यापूर्वी निष्पादित करण्यात आलेल्या उक्त नमुद संलेख तथा दस्तांनाच लागू असेल. 1 ) या आदेशाखालील उक्त कपात, ज्या प्रकरणी चुकवेगिरीची किंवा अडकवून ठेवण्याची किंवा अभिनिर्णयाची कार्यवाही सुरू करण्यात आलेली असेल आणि ज्या प्रकरणी, उक्त अधिनियमाची कलमे 31, 32 अ , 33 , 33 अ , 46, 53 ( 1 अ ) व 53 अ यांच्या तरतुदी अन्वये 31 मार्च, 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पक्षकारावर किंवा निष्पादकावर किमान एक नोटीस बजावण्यात आलेली आहे अशा प्रकरणीच केवळ लागू असेल. तसेच, या आदेशाखालील उक्त कपात, ज्या प्रकरणी उक्त अधिनियमाच्या तरतुदी अन्वये, कोणत्याही प्राधिकरणासमोर किंवा न्यायालयासमोर अपील किंवा पुनर्विलोकन किंवा पुनरीक्षण अर्ज प्रलंबित आहे अशा प्रकरणी देखील लागू असेल.
अधिक माहितीसाठी संपर्क
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशने – परिपत्रक- मुद्रांक – अभय योजना या सदराखाली 2 मार्च 2019 रोजी चा अध्यादेश नागरिकांसाठी उपलब्ध करु न देण्यात आला आहे. याशिवाय अधिक माहितीसाठी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधता येईल. या योजनेसंदर्भात कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाच्या हेल्पलाईन 8888007777 या हेल्पलाईन नंबरवर किंवा complaint@igrmaharashtra.gov.in या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.