By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तथा आ .संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांचे बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. रेखाताई यांच्या पार्थिवदेहावर गुरूवारी (दि 21) सकाळी 10 वाजता नवगण राजुरी येथील खालचा मळा या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांना बुधवारी सायंकाळी अस्वस्थ जाणवू लागल्याने तात्काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले . जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली.
रेखाताई यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. रेखा क्षीरसागर अनेकवर्ष राजुरी गावच्या सरपंच होत्या तसेच त्या बीड जिल्हा परिषदेच्या सदस्य देखील होत्या. मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काकू – नाना विकास आघाडीकडून त्या बहिरवाडी जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या होत्या. रेखाताई क्षीरसागर या धार्मिक वृत्तीच्या होत्या.
त्यांच्या पश्चात पती माजी सभापती रवींद्र क्षीरसागर, आ. संदीप क्षीरसागर , हेमंत आणि अर्जुन ही मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या त्या भावजय होत.क्षीरसागर कुटुंबियांच्या दुःखात महाटाइम्स परिवार सहभागी आहे.