भारतमाला परीयोजनेतून होणार 1289 किलोमीटर लांबीचा रस्ता
ताशी 120 किलोमीटर वेगाने होणार वाहतूक; उद्योग वाहतुकीस चालना देण्याचे सरकारचे धोरण
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
भारतमाला परीयोजनेतून सुरत अहमदनगर चेन्नई एक्सप्रेस वे चा काही भाग रस्ता बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून जाणार आहे. एकूण 1 हजार 289 किलोमीटर लांबीच्या या ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे मुळे सुरत ते चेन्नई मधील अंतर कमी होणार आहे. या एक्सप्रेस वे सोबत ड्रायपोर्ट निर्मिती व उद्योग वाहतुकीस चालना देण्याचे सरकारचे धोरण आहे.
या एक्सप्रेस महामार्गाच्या कामाबाबत पूर्वतयारी बैठक सोमवारी (18 April) जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. प्र.जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस खासदार डॉ.प्रीतम मुंडे, आमदार बाळासाहेब आजबे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण, भूसंपादन उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, पाटोदा उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे तसेच प्राधिकरणाचे डीजीएम मिलिंद वाबळे, अभियंता बी.एफ पाटणकर तसेच ओ.ए. देवकर, पी.व्ही. रतनकुमार आदी उपस्थित होते.
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील नांदूर पासून वाळुंज पर्यंतच्या अकरा गावांच्या हद्दीतून हा 38 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेस रस्ता जाणार असून बीड जिल्ह्याच्या हद्दीत या एक्सप्रेस वे वर प्रवेश करण्यासाठी इंटर चेंजेस राहणार आहे. लगतच्या जामखेड जवळ देखील दूसरा इंटरचेंज राहिल या दोन्हीचा फायदा बीड जिल्ह्यातील जनतेला होईल.
जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदनगर ते अक्कलकोट या २३५ किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या कामापैकी जिल्ह्यातील विविध कामांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. या सहापदरी एक्सप्रेस वे च्या बाजूस राहणाऱ्या नागरिक व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक एक किलोमीटर ला अंडरपास दिले जाणार आहेत.