कालिका मंदिरात कासार समाजाचा वार्षिक उत्सव साजरा
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
गुणवत्ता हा परवणीचा शब्द झाला असून ज्ञानवान, गुणवान व्हायचं असल तर सरस्वतीच्या पायथ्याशी बसून खडतर तपश्चर्या करावी लागेल. स्पर्धेच्या युगात बुध्दीला आणि कौशल्याला महत्व आहे असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
कालिका मंदीर, नेकनूर येथे शनिवार दि.16 रोजी कासार समाजाचा यात्रा महोत्सव आयोजीत करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अखिल भारतीय कासार समाजाचे अध्यक्ष शरद बांडेकर, लातूरचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, शिरूर कासारच्या नगराध्यक्षा प्रतिभा रोहीदास पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, अरूण डाके, रामदास फुटाणे, शिवाजी काटकर, बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले की, कालिका मंदिरातील वार्षिक उत्सव गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या अदृश्य विषाणूने आपल्याला जायबंद केलं होतं म्हणून हा उत्सव दोन वर्षांनी पुन्हा सुरू झाला. कोरोना हा विषाणू वेगवेगळे रूप धारण करून अजूनही काही ठिकाणी प्रवेश करत आहे. कोरोना काळात खंडीत झालेले सन, उत्सव, लग्न पुन्हा सुरू होत आहेत. सातत्याने महाराष्ट्रात कासार समाज एकत्र येऊन उत्सव साजरा करतात आणि एकमेकांच्या गाठी-भेटी घेतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव साजरा होत आहे. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील समाज या उत्सवाच्या निमित्ताने विखुरलेला असतानाही एकत्र येत आहे.
ओबीसी समाजाला आरक्षण दिले पाहिजे. जि.प., पंचायत समिती, नगरपालिका निवडणूका आरक्षणामुळे पुढे ढकलल्या आहेत. आरक्षण हा घटनेने दिलेला मुलभूत हक्कच आहे. आपल्याला दिलेल्या हक्कासाठी जागृत राहणे गरजेचे आहे. गुणवत्ता हा कोणाचा हक्क नाही. धनवानाचा मुलगा धनवान होतो पण ज्ञानवान, गुणवान व्हायचे असेल तर रात्रीतून चमत्कार होत नाही. स्पर्धेच्या युगात जातीपातीच्या नावावर न राहता गुणवत्तेच्या जीवावर आपण सर्वांना मागे पाडू. जो ताकतवान असेल तोच स्पर्धेत तगेल आणि पुढे जाईल हा येणार्या काळाचा मंत्र आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास महिला, पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.उज्वला कोळपकर यांनी केले तर प्रास्ताविक श्रीकांत ईटकर यांनी केले.