सलग 11 दिवस विविध उपक्रमासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे मंत्री मुंडे यांनी मानले आभार
By MahaTimes ऑनलाइन – मुंबई |
राज्यभरात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक समता कार्यक्रमाची आज सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवून सांगता करण्यात आली. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात जयंती उत्सव शासकीय स्तरावरून साजरा करण्याची अनोखी संकल्पना राबवली.
विविध शहरातील महापुरुषांची स्मारके, बाजारतळ, जलाशय परिसर, प्रमुख रस्ते, चौक, शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, यामध्ये विभागातील अधिकारी- कर्मचारी यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे दिसून आले.
मागील दोन वर्षात कोविड निर्बंधांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम सार्वजनिक रित्या साजरा करता आला नव्हता. त्यामुळे यावर्षी धनंजय मुंडे यांनी राज्यभरात जयंती उत्सव शासकीय स्तरावरून साजरा करण्याची अनोखी संकल्पना राबवली होती.
याअंतर्गत दि. 06 एप्रिल ते दि. 16 एप्रिल असे सलग 11 दिवस राज्यभरातील सर्व जिल्ह्यातून समाज कल्याण कार्यालयांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, व्याख्याने, मार्जिन मनी, मिनी ट्रॅक्टर यांसारख्याविविध योजनांच्या सामूहिक व व्यक्तिगत लाभ वितरणाचे कार्यक्रम, विविध योजनांबद्दल जनजागृती, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अभिवादनाचे भव्य कार्यक्रम यांसारखे अनेक कार्यक्रम राज्यभरात राबवण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाच्या मागील 11 दिवसातील सर्व उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधी, विभागातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व भीम अनुयायांचे धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत.
खुद्द पवार साहेबानी केले मुंडेंचे कौतुक
दि. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत असताना “धनंजय मुंडे यांनी आपल्या कौशल्यातून विभागातील अनेक योजनांना नाविन्यपूर्ण स्वरूप दिले, त्याचे सकारात्मक परिणाम आपण पाहतो आहोत. विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी परदेशात शिकत आहेत, काही मोठमोठे अधिकारी, उद्योजक बनले आहेत. अशी अनेक महत्वाकांक्षी पाऊले मुंडे यांच्या कार्यकाळात उचलण्यात आली असून, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात विभागाचे नाव अधिक उंचीवर जाईल तसेच समाजातील गरजू दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्याची परंपरा अबाधित राखली जाईल,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार साहेबांनी धनंजय मुंडे यांचे व सामाजिक न्याय विभागाचे कौतुक केले होते.