प्रधानमंत्री कुसूम योजना : 34 शेतकऱ्यांची 432 एकर नापीक जमीन प्रकल्पासाठी अधिगृहित
एकरी 30 हजार रुपये प्रमाणे भाडे देय असणार
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
नापीक आणि अकृषीक जमिनीचा वापर करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कुसूम (प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान) योजना केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येत आहे. या योजनेव्दारे सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणारी वीज महावितरणला विकून अथवा सौर प्रकल्पासाठी जमीन भाडेपटटीवर देवून उत्पन्न मिळविण्याची संधी शेतकर्याला करुन देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत 0.5 ते 2 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रीकृत सौरऊर्जा प्रकल्प प्राधन्याने शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था आणि पाणी वापरकर्ता संघटना हे सौरऊर्जा प्रकल्प विकिसत करु शकतात. सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक समभागाची व्यवस्था करण्यास सक्षम नसणाऱ्यांनी विकासकांव्दारे सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा पर्याय निवडलेला आहे. अशा परिस्थितीत भाडेपटटी कराराव्दारे जमीन मालकाला त्यांच्या जमिनीचे भाडे मिळणार आहे. एकरी 30 हजार रुपये प्रमाणे भाडे देय असणार आहे.
सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी स्टिल्ड रचनापध्दती वापरुनही करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला त्यांच्या जमीनीचा वापर भाडेपटटी व्यतिरिक्त पिकांच्या लागवडीसाठीही करता येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये विकासकाव्दारे जमीनीचे भाडे मिळणार आहे.
सौर ऊर्जा प्रकल्प हे महावितरणच्या जवळच्या 33/11 केव्ही उपकेंद्राशी थेट जोडले जाणार आहेत. जमीनमालक अथवा करारदारासोबत उद्देशीय पत्र जारी केल्यापासून 12 महिन्यांच्या आत सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणे बंधनकारक असणार आहे. वीज खरेदी करार 25 वर्षाकरीता असणार आहे.
बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी
प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यात 6 लाभार्थ्यांच्या 62.11 एकर, बीड जिल्ह्यात 14 लाभार्थ्यांच्या 234.22 एकर तर उस्मानाबाद जिल्हयातून 14 लाभार्थ्यांच्या 135.23 एकर जमीनींची निवड करण्यात आली आहे.
टिप्स आणि ट्रिक्ससाठी खालील वेबसाइटला भेट द्या
www.thetechnotips.com