वागबेट येथील पेयजल योजनेसह विविध विकास कामांचा शुभारंभ
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
परळी मतदार संघातील जनतेने मला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिले माझ्या संघर्षाच्या काळात माझ्या पाठीशी इथल्या जनतेने ताकद उभी केली त्यांचे ऋण मी कधीही विसरणार नाही. परळी मतदारसंघ राज्यात नावाजला जाईल असा विकास येत्या काळात करून दाखवू, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील वागबेट येथे बोलताना केले.

वागबेट गावची मागणी असलेल्या नागापूर धारणातून वागबेट येथे पाणी आणण्याच्या एक कोटी 26 लाख रुपयांच्या पेयजल योजनेसह गावातील हनुमान मंदिरासमोरील सभागृह (25 लाख) या कामांचे भूमिपूजन तसेच स्मशान भूमी, बैठक व्यवस्था, सिमेंट रस्ते आदी पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले; या कार्यक्रमात ते बोलत होते.
गावाजवळील पाणी पिण्यायोग्य नसल्याने गावचे सरपंच व सदस्यांनी नागापूरच्या धरणातून पाणी आणावे अशी मागणी होती, त्यानुसार या कामास मंजुरी देण्यात आली आहे. वागबेट गावसह तालुक्यात शेकडो सिंचन विहिरांना पंचायत समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, तसेच याही वर्षी 5000 विहिरींना मंजुरी देण्यात येणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.
लोकसंख्येच्या प्रमाणाचा प्रश्न असताना देखील धनंजय मुंडे यांनी विशेष प्रयत्न करून गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला असून, हे गाव कायमस्वरूपी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास गावकऱ्यांच्या वतीने सरपंच अमरनाथ गित्ते यांनी व्यक्त केला.

यावेळी पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, बाजार समितीचे संचालक माणिकभाऊ फड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिक अण्णा कराड, पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, सरपंच अमरनाथ गित्ते, पंचायत समिती सदस्य माऊली मुंडे, मार्केट चे संचालक माणिकभाऊ फड, कांताभाऊ फड, हरीश नागरगोजे, बापू नागरगोजे, भाऊसाहेब कराड, प्रल्हाद नागरगोजे, युनूस भाई, गोविंद कराड यांसह आदी उपस्थित होते.
ऊसाचे राजकारण नको
दरम्यान बीड जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र यावर्षी अतिरिक्त असून संपूर्ण ऊस गाळप होण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी सर्व ऊस गाळप केला जाईल यासाठी प्रयत्न करावेत. जाणीव पूर्वक राजकारण साधण्यासाठी ऊसाची अडवाअडवी कोणी करत असेल तर असे राजकारण खपवून घेतले जाणार नाही, त्यास जशास तसे उत्तर देऊ, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
