शहरात शोककळा पसरली
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीडहून हैदराबादला जाणा-या मित्राला पोहचविण्यासाठी परळी रेल्वे स्टेशनकडे गेलेल्या तरूणांच्या स्कूटीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 15) रात्री घाटसावळी नजीक घडला.
प्राप्त माहितीनुसार, बीड शहरातील बशीरगंज येथील रहिवासी हाफेज मारूफ शफीक फारुकी (वय 22) आणि शेख सादेक सलीम बागवान (वय 19) हे दोघेजण बीडहून हैदराबादला जाणा-या मित्राला पोहचविण्यासाठी स्कूटीवरून (एमएच 23 बीडी 2500) परळी रेल्वे स्टेशन गेले होते. दरम्यान घाटसावळी जवळ अज्ञात वाहनाने स्कूटीला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की स्कूटीवरील मारूफ आणि सादेक हे स्कुटी सह दूरवर फेकले गेले. यात ते गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सदर अपघाताची माहिती उशीराने मिळाली तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. परिसरातील गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. आणि मयतांची ओळख पटल्यानंतर नातेवाईकांना कळविले.
याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघातात दोन तरूणांच्या दुर्दैवी मृत्यूची माहिती समजताच शहरात शोककळा पसरली. बुधवारी दुपारी दोन वाजता तकिया मस्जिद कब्रस्तान येथे त्यांचा दफनविधि पार पडला. सदर घटनेने बागवान-फारूकी कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.