10 मार्च पर्यंत हजर होणा-या कर्मचा-यांविरोधात कारवाई नाही
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
एसटी महामंडळाच्या नावे व्हायरल होत असलेले ‘ते’ परिपत्रक पुर्णत: खोटे व बनावट असून 10 मार्च पर्यंत कर्तव्यावर हजर होणा-या कर्मचा-यांविरोधात कारवाईचा एसटी महामंडळाचा कसला ही मानस नाही. सदर बनावट परिपत्रक कर्मचा-यांमध्ये हेतूपुरस्सर संभ्रम निर्माण करुन त्यांना आपल्या कर्तव्यावरुन परावृत्त करण्याच्या गैर-उद्देशाने कोणीतरी अज्ञात व्यक्ती अथवा समुहाने प्रदर्शित केले आहे असा आशयाचा खुलासा मंगळवारी (दि. 8 मार्च 2022) महामंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.
संपामध्ये सहभागी झालेल्या व सध्या आपल्या कर्तव्यावर रुजू झालेल्या होत असलेल्या एसटी कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे दि. 7.3.2022 या तारखेचे एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (कर्मचारीवर्ग) यांच्या स्वाक्षरीने खोटे व बनावट परिपत्रक समाजमाध्यमाब्दारे व्हायरल झाले आहे.
संबंधित अज्ञात व्यक्ती अथवा समुहावर तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी तक्रार एसटी महामंडळाच्या वतीने पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
तसेच दि. 10 मार्च, 2022 पर्यंत हजर होणाच्या एसटी कर्मचा-यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्याचा एसटी महामंडळाचा मानस नाही. एसटीच्या सर्व कर्मचा-यांना सदर वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी व संभ्रम दूर व्हावा या हेतूने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मध्यवर्ती कार्यालय मुंबई सेंट्रल जनसंपर्क अधिकारी यांच्या स्वाक्षरीने एक प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे.