अर्धमसला, जातेगाव, नंदपूर, भेंड (खु.), भेंडटाकळी तलावांची होणार दुरुस्ती
विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
गेवराई तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पाझर आणि सिंचन तलावांच्या दुरुस्तीसाठी 4 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी जलसंधारण विभागाने मंजुर केला आहे. अर्धमसला, जातेगाव, नंदपूर, भेंड (खु.), भेंडटाकळी येथील तलावांची दुरुस्ती या निधीमधून होणार असल्याची माहिती विजयसिंह पंडित यांनी दिली.
गेवराई विधानसभा मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाझर तलाव आणि सिंचन तलावांचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष दौरा करून पाहणी केली होती.
माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंह पंडित यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेले पाझर तलाव, सिंचन तलाव आणि बंधार्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा म्हणून शासनाकडे पाठपुरावा केला, याकामी त्यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांची भेट घेवून पाठपुरावा केला होता. यापूर्वी शासनाने १७ तलावांच्या दुरुस्तीसाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला होता.
जलसंधारण विभागाने दिली प्रशासकीय मान्यता
जलसंवर्धन योजनेअंतर्गत ५० लक्षहून अधिक किंमतीच्या कामांसाठी अर्धमसला पाझर तलाव ५८.२२ लक्ष, जातेगाव पाझर तलाव ९१.८१ लक्ष, आम्ला पाझर तलाव ६६ लक्ष, नंदपूर पाझर तलाव ६९.३७ लक्ष, भेंड (खु.) पाझर तलाव ६३.५१ लक्ष, भेंडटाकळी सिंचन तलाव ७१.७० लक्ष असा एकुण सहा तलावांच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी २० लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. पाझर तलावांच्या दुरुस्तीच्या कामास जलसंधारण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असून लवकरच या कामाच्या निविदा प्रक्रिया सुरु होतील अशी माहिती विजयसिंह पंडित यांनी दिली. आघाडी शासनाने सिंचन विषयक कामास प्राधान्य दिल्यामुळे भविष्यात गेवराई विधानसभा मतदार संघात सिंचन क्षेत्र वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.