मदरसा दारु ल उलूम बीडचा 60 वा जलसा-ए-आम उत्साहात
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
मदरशांमध्ये मदरशांमध्ये धार्मिक शिक्षणासोबतच सदाचाराचे उत्तम शिक्षण दिले जाते. एक-दुसऱ्याशी कसे वागावे, आपले अधिकार काय आहेत याचे शिक्षण देउन एक आदर्श व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम केले जाते. माणुसकी व सदाचारामुळे आतंकवाद संपुष्टात येईल असे रोकठोक विचार मौलाना कारी रशीद अहमद अजमेरी यांनी व्यक्त केले.
मदरसा दारु ल उलूम बीडचा 60 वा जलसा-ए-आम गुरु वार, 24 फेब्रुवारी रोजी मौलाना अब्दुल जब्बार साहेब मजाहिरी नक्शबंदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी मौलाना कारी रशीद अहमद साहब अजमेरी यांनी वरील विचार मांडले. याप्रसंगी मंचावर मुफ्ती आरिफ साहब, मुफ्ती जावेद हुसैनी साहब आदींची प्रमुख उपस्थिती होती.
रशीद अहमद साहब पुढे म्हणाले की, मदरशांचे काम खूप महान आहे. दगडासारख्या मुलांना हिऱ्याप्रमाणे घडवून त्यांना कुटुंबाच्या हवाली केले जाते. ते पुढे म्हणाले की, कुराण शरीफ समस्त मानवजातीसाठी अवतरले आहे. जो हे पवित्र पुस्तक वाचतो आणि जिथे वाचले त्या ठिकाणी अल्लाहची कृपा बरसते. आज प्रत्येकाच्या घरात कुराण शरीफ आहे. ते बरकत म्हणून ठेवले जाते. पण कुरआन शरीफला प्रत्यक्षात समजून वाचण्याची व त्यानुसार आचरण करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अल्लाह कृपाळू आहे. कृपा व्यक्ती, प्राणी सर्वांसाठी आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर (सल.) यांना मार्गदर्शक, सदाचरणाचे मौलीम (शिक्षक) म्हणून पाठवले असून तेच जगतगुरु आहेत. यावेळी मौलानांनी सर्वांना मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणी अंमलात आणण्याचा सल्ला दिला.
याप्रसंगी मौलाना अब्दुल जब्बार साहेब मजहिरी, मुफ्ती आरिफ साहब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कुरआन शरीफ मुखोदगत करणारे 42 विद्यार्थी, 10 विद्यार्थ्यांचा जलालेन शरीफ आणि 14 मुलांना संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. मुफ्ती जावेद हुसैनी साहब यांनी प्रस्तावना मांडली.
यावेळी हाजी एक्बाल कुरैशी, हाजी अब्दुल जब्बारखां, मुफ्ती सगीर आलम, हाजी अब्दुल जब्बार कुरैशी, मौलाना सय्यद साबिर, हाफिज जाकिर सिद्दीकी, मौलाना अब्दुल बाकी हुस्सामी, हाफिज अब्दुल सत्तार, मौलाना शेख अहमद काशफी, मौलाना चांदपाशा साहब, मौलाना मुख्तार कासमी, मौलाना अब्दुल वहीद, मौलाना अब्दुल रहीम, मुफ्ती मोहियोद्दिन, मुफ्ती तवक्कल कासमी, मौलाना अब्दुल सत्तार बैती, माजी आ. सिराज देशमुख, राजनितीक, सामाजिक, व्यापार क्षेत्रातील मान्यवर मंडळी, उलेमा, हुफ्फाज आणि इमाम मोठ्या संख्याने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, मदरशातील शिक्षक, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.