राज्यभरातील कलावंतांमध्ये उत्सुकता
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
राज्यस्तरीय नाट्य शिबिराचे उद्घाटन रविवारी (दि. 20) सायंकाळी पाच वाजता प्रख्यात नाट्य-चित्रपट मालिका कलावंत व नाट्यगुरू डॉ. दिलीप घारे यांच्या हस्ते होत आहे. कोरोनाच्या संकटाने मराठी रंगभूमीवर आलेले सावट आता संपत असून दोन वर्षानंतर प्रथमच बीडला होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्य शिबिराची रंगकर्मीनां उत्सुकता लागली आहे.
या प्रसंगी नाटककार व प्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्या प्राचार्य डॉ. दीपाताई क्षीरसागर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. हे शिबिर स. मा. गर्गे सभागृह, पत्रकार भवन, बीड येथे संपन्न होत आहे.
राज्यभरातून मोठा प्रतिसाद
शिबिर संचालक डॉ सतीश साळुंके यांनी सांगितले की, या शिबिरासाठी राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरार्थींची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून शिबिरास राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना. अमित देशमुख व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नाट्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिबिर संचालक प्रा केशव भागवत आणि अशोक घोलप हे परिश्रम घेत आहेत.
20 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान नाट्य शिबिराचे आयोजन
सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र सरकार व नाट्य परिषद बीड यांच्या संयुक्त तत्वावधानाने राज्यस्तरीय नाट्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिविर 20 फेब्रुवारी ते 11 मार्च 2022 दरम्यान पार पडणार आहे.