अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे सुरक्षित – पशुसंवर्धन आयुक्तालयाची माहिती
नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेऊ नये
By MahaTimes ऑनलाइन – मुंबई |
ठाणे जिल्ह्यातील वेहळोली (ता. शहापूर) येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील एक किलोमीटरचे क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. नसून संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
ठाणे जिल्ह्यात वेहळोली वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झालेली अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे सुरक्षित आहे, नागरिकांनी घाबरु न जावू नये, गैरसमज व अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात 17 फेब्रुवारी 2022 पर्यंत 300 कोंबड्या आणि नऊ बदकांमध्ये बर्ड फ्लू आढळून आला आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ठाण्याच्या जिल्हाधिकार्यांकडून प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. या निर्बंधांनुसार वेहलोळी येथील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरामध्ये येणार्या सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येत आहेत.
दरम्यान, बर्ड फ्लूचा प्रार्दूभाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व पोल्ट्रीधारक आणि नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत स्वरूपात आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमी पेक्षा जास्त प्रमाणात मृत पक्षांची संख्या वाढल्याचे लक्षात आल्यास तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय रूग्णालयात याची माहिती दयावी,असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.
अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे सुरक्षित- पशुसंवर्धन आयुक्तालय
बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. अंडी किवा कोंबडीचे मांस 70 अंश सेल्सिअस तापमानावर 30 मिनिटे शिजवून खाल्ल्याने विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे सुरक्षित असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिली आहे. शिवाय बर्ड फ्ल्यू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.
अशी घ्या काळजी?
पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृत पक्षांना हात लावू नये, किंवा त्यांचे शवविच्छेदन करु नये. याबरोबरच या पक्षांची परस्पर विल्हेवाट लावू नये. याबरोबरच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री 18002330418 आणि पशुसंवर्धन आयुक्तालयातील कॉल सेंटर 1962 या नंबरवर फोन करून माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.