आष्टीत पल्लवी धोंडे, पाटोद्यात सय्यद खतीजाबी, शिरूरमध्ये प्रतिभा गाडेकर, केजमध्ये सीता बनसोड, वडवणीत वंदना जगताप नगराध्यक्षपदी विराजमान
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्ह्यात पाचही नगरपंचायतीत महिलाराज आले असून या महिलांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. आष्टीत पल्लवी धोंडे, पाटोद्यात सय्यद खतीजाबी, शिरूरमध्ये प्रतिभा गाडेकर, केजमध्ये सीता बनसोड, वडवणीत वंदना जगताप नगराध्यक्षपदी यांची निवड झाली.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांच्या स्नुषा पल्लवी धोंडे यांना नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी शैलेश सहस्रबुद्धे यांना संधी दिली तर पाटोदा नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्या भावजय सय्यद खतीजाबी सय्यद अमर यांची तर उपनगराध्यक्षपदी शरद बामदळे यांची निवड झाली आहे. शिरूर नगरपंचायत अध्यक्षपदीआमदार धस यांनी माजी नगराध्यक्ष रोहिदास गाडेकर यांची पत्नी प्रतिभाताई पाटील यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली. येथे उपाध्यक्षपदी स्वेता देसरडा यांची निवड झाली आहे. केजच्या नगराध्यक्षपदी जनविकास परिवर्तन आघाडीच्या सीता प्रदीप बनसोड यांची तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा शीतल दांगट यांची बिनविरोध निवड झाली आहे. रोमांचक ठरलेल्या वडवणी नगर पंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस व शहर बचाव आघाडीच्या वंदना जगताप यांची नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी बन्सीधर मुंडे यांची निवड झाली आहे.
नगराध्यक्षपदी सीता बनसोड, उपनगराध्यक्षपदी शीतल दांगट
केज- केजच्या नगराध्यक्षपदासाठी जनविकास आघाडीच्या सीता प्रदीप बनसोड तर उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा शीतल पशुपतिनाथ दांगट यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी निवडीकडे पाठ फिरवली. त्यामुळे नगराध्यक्षपदी सीता बनसोड व उपनगराध्यक्षपदी शीतल दांगट यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी जनविकास परिवर्तन आघाडीच्या सिता बनसोड यांचा तर,उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रीय कॉंग्रेसच्या शितल दांगट यांचे प्रत्येकी एक-एकच अर्ज आले होते, त्यामुळे दोन्ही पदांची निवडणूक विनविरोध झाली. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवड होताच आनंद साजरा करत नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, आदित्य पाटील, राहुल सोनवणे, बाळासाहेब ठोबरे, हारून इनामदार, अंकुश इंगळे, सुरेश पारटील, रिपाईचे दिपक कांबळे, पशुपतीनाथ दांगट, प्रविणकुमार शेप यांच्या सह शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोलताशा, तसेच गुलाल ची उधळण करीत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला
आष्टीच्या नगराध्यक्षपदी पल्लवी धोंडे, उपनगराध्यक्षपदी शैलेश सहस्रबुद्धे
आष्टी येथे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांच्या सून पल्लवी धोंडे यांना नगराध्यक्षपदी संधी दिली असून उपनगराध्यक्षपदी शैलेश सहस्रबुद्धे यांची निवड केली आहे. आष्टी नगरपंचायतीमध्ये 17 पैकी 10 जागी भाजप तर अन्य तीन ठिकाणी भाजप पुरस्कत उमेदवार निवडून आणल्याने भाजपचे संख्याबळ तेरावर गेले होते. आमदार धस यांनी पल्लवी धोंडे यांची नगराध्यक्षपदी निवड करत माळी समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. तर उपनगराध्यक्षपदी शैलेश सहस्रबुद्धे यांची निवड केली आहे.
पाटोद्याच्या नगराध्यक्षपदी सय्यद खतिजाबी, उपनगराध्यक्षपदी शरद बामदळे
पाटोदा- येथील नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील मिहलेसाठी आरिक्षत होते. अपक्ष निवडून आलेल्या सय्यद खतिजाबी यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. खतिजाबी या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सय्यद अब्दुला यांच्या भावजय आहेत. अब्दुल्ला हे यंदा नगरपंचायत निवडणुकीमध्ये उतरले होते. नगराध्यक्षपद सर्वसाधारण मिहलेसाठी राखीव राहिल्याने त्यांचा हिरमोड झाला. सय्यद खतिजाबी यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागल्याने नगराध्यक्षपद राखण्यात त्यांना यश आले आहे. तर शरद बामदळे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
शिरूरच्या नगराध्यक्षपदी प्रतिभा गाडेकर, तर उपनगराध्यक्षपदी श्वेता देसरडा
शिरूर – येथील नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रतिभा रोहिदास गाडेकर पाटील यांची तर उपाध्यक्षपदी भाजपच्या श्वेता प्रकाश देसरडा यांची निवड झाली आहे. निवडणूक प्रक्रि येत शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे दोन सदस्य तटस्थ राहिले होते. शिरूरच्या निवडणुकीमध्ये भाजपचे 17 पैकी 11 सदस्य निवडून आले होते. निवडणुकीत शिरूरच्या सभेतच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासमोर आमदार सुरेश धस यांनी गाडेकर हेच नगराध्यक्षपदी कायम राहतील, असे सांगितल्यामुळे प्रतिभा गाडेकर यांची वर्णी लागली आहे.
वडवणीच्या नगराध्यक्षपदी वंदना जगताप तर उपनगराध्यक्षपदी बन्सीधर मुंडे
वडवणी -नगरपंचायतीच्या सभागृहात नगरसेवक आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व शहर बचाव आघाडीच्या वंदना जगताप यांची नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी बन्सीधर मुंडे यांची निवड झाली. भाजपच्या नगरसेविका रूपिका विनय नहार यांच्यावर अतिक्र मणाचा आरोप असल्यामुळे त्यांना मतांचा अधिकार जिल्हाधिकार्यांनी नाकारल्याने भाजपच्या नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी मंगल मुंडे यांनी तर उपनगराध्यक्षपदासाठी मीरा ढोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.