गेवराई तालुक्यातील शहजानपूर चकला परिसरातील हृदयद्रावक घटना
दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल -पालकमंत्री
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
गेवराई तालुक्यातील शहजानपूर चकला परिसरातील सिंदफणा नदी पात्रातील खड्ड्यात बुडून चार बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी रात्री उशीरा उघडकीस आली.
गेवराई तालुक्यातील गोदवरी व सिंंदफणा नदी पात्रात अवैध वाळू उपसा जोमात सुरू आहे. नदीकाठी खेळायला गेलेल्या चार मुलांचा वाळू उपशामुळे तयार झालेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यू पावलेले चौघे शहजानपूर चकला येथील रहिवाशी असून मयता मध्ये बबलू गुणाजी वक्ते (13), गणेश बाबुराव इनकर (13), आकाश राम सोनवणे (11) आणि अमोल संजय कोळेकर (12) यांचा समावेश आहे.
दरम्यान दोनच दिवसापुर्वी राजेंद्र शिंदे या मजुराचा केणी डोक्याला लागून राक्षसभुवन येथे मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा दुसरी घटना घडली. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल
गेवराई तालुक्यातील शहजानपूर चकला येथे नदीपात्रातील खड्ड्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दुःखद वृत्त समजते आहे. जिल्हा प्रशासनास अधिक तपास व चौकशी तातडीने करण्याच्या सूचना दिल्या असून अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती घेत असुन, शासकीय मदतीबरोबरच या घटनेला मानवी चुका कारणीभूत असतील तर, दोषी कुणीही असो, त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. मृतांच्या कुटुंबियांच्या प्रति मी सहसंवेदना व्यक्त करतो.
धनंजय मुंडे पालकमंत्री, बीड