बीड नगर परिषद क्षीरसागर मुक्त- भाजपा चा नारा – राजेंद्र मस्के
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड नगर परिषदेची आगामी काळात होऊ घातलेली निवडणूक भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढवणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस,शिवसेना या महाविकास आघाडीला नगर पालिकेतून हद्दपार करून बीड नगरपरिषद क्षीरसागर मुक्त करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
बीड शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून शहरातील नागरिकांना रस्त्यात असणारे खड्डे आणि धुळी मुळे श्वसनाचे आजार जडले आहेत. पिण्याचे पाणी पंधरा वीस दिवस मिळत नाही. रस्त्यावरील पथदिवे कायम बंद असतात. या सर्व समस्यांमुळे बीडकर जनता त्रस्त झाली आहे. नगराध्यक्ष भारत भूषण क्षीरसागर व आमदार संदीप क्षीरसागर हे भाजप सरकारच्या काळात आलेल्या अमृत अटल योजना, भुयारी नाल्यांची योजना किंवा रस्त्यांच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी धडपडतात. परंतु महाविकास आघाडी सरकारकडून त्यांनी शहराच्या विकासासाठी कसलाही निधी आणलेला नाही. भारतीय जनता पार्टी आता बीड शहराच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्या क्षीरसागरांना बीड नगरपालिकेतून हद्दपार करणार असून बीड शहरातील जनतेला पारदर्शक आणि चांगला कारभार करणारे उमेदवार देऊन आगामी निवडणुकीत पूर्ण ताकतीने निवडणूक स्वबळावर लढवणार आहे.
भारतीय जनता पार्टीच्या संघर्ष योद्धा या जिल्हा कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी, बीड नगरपरिषद निवडणूक २०२२ संदर्भात स्पष्ट भूमिका मांडली या पत्रकार परिषदेस जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, प्रा.देविदास नागरगोजे, नवनाथ शिराळे, सलीम जहागीर, शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी, अजय सवाई, डॉ लक्ष्मण जाधव, संग्राम बांगर, शांतीनाथ डोरले, कपिल सौदा, आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी प्रस्ताविक करून पत्रकारांचे स्वागत केले तर अजय सवाई यांनी आभार मानले.