लाभार्थ्यांना विजयसिंह पंडित यांच्याहस्ते मंजुरीपत्राचे वाटप, संग्रायो समितीचा पारदर्शक कारभार विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नये
By MahaTimes ऑनलाइन – गेवराई / बीड |
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी विशेष सहाय्य योजनेतील सुमारे 1247 लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप बीड जि.प. चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याहस्ते करण्यात आले. गेवराई तहसिल कार्यालयात प्रातिनिधीक स्वरुपात कोरोना विषयक नियमांचे पालन करून 60 लाभार्थ्यांना उपजिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्यासह संग्रायो समितीचे अध्यक्ष व सदस्यांच्या उपस्थितीत मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले, याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या आदेशाने गेवराई तालुका संग्रायो समितीचे गठन करण्यात आले. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे अध्यक्ष राधेशाम येवले व इतर सदस्यांनी अतिशय पारदर्शक कारभार केल्यामुळे तहसिल कार्यालयातील दलालांचा कारभार चव्हाट्यावर आला. विद्यमान भाजपा आमदार यांनी त्यांच्या कार्यकाळात मंजुरीपत्र वाटप केलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम मिळू शकली नाही, हे त्यांचे मोठे अपयश आहे. स्वतःच्या अकार्यक्षमतेचे आणि अपयशाचे खापर ते या समितीवर फोडत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या भुलथापांना कोणीही बळी पडू नये असे प्रतिपादन विजयसिंह पंडित यांनी केले. त्यांनी विद्यमान संग्रायो समितीच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त करून अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचे आवाहन केले. संग्रायो समितीने 1247 प्रकरणे निकाली काढली असून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा रास्त लाभ दिल्याची माहिती संग्रायो समितीचे अध्यक्ष राधेशाम येवले यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी चौगुले, तहसिलदार सचिन खाडे, संग्रायो समितीचे अध्यक्ष राधेशाम येवले, सदस्य बापू गाडेकर, शिवाजी डोंगरे, मन्सुर शेख, सय्यद सिराज, रघुनाथ मोरे यांच्यासह अक्षय पवार, दत्ता दाभाडे, वचिष्ट शिंदे, गोरखनाथ शिंदे, संदीप मडके, भाऊसाहेब माखले, राम म्हेत्रे, वसीम फारुकी, आनंद दाभाडे, रवि दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, ऋषिकेश मोटे, निराधार समिती विभागातील कर्मचारी नामदेव खेडकर, विठ्ठल सुतार यांच्यासह गेवराई तालुक्यातून आलेले लाभार्थी उपस्थित होते.