बालिका दिनानिमित्त पंधरवडाचे आयोजन
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
भारतीय डाक विभाग बीड यांच्या वतीने दि. 24 जानेवारी रोजी बालिका दिनानिमित्त 17 ते 31 जानेवारी पर्यंतच्या कालावधीत सुकन्या समृद्धी योजना पंधरवाडाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये वय वर्ष 0 ते 10 वर्षे वयोगटातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल यासाठी फक्त रु.250 चे खाते उघडण्याची सुविधा भारतीय डाक विभाग बीड येथे सुरु करण्यात आली आहे.

बीड विभागातील प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये हा पंधरवाडा (पखवाडा ) आयोजित केला गेला आहे. तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती किंवा समाजसेवकांनी आयोजीत केलेल्या सुकन्या समृद्धी योजना पखवाडामध्ये जास्तीत जास्त खाते उघडण्यास मदत करावी व आपल्या भागातील बालिकांचे भविष्य उज्वल करण्यास मदत करावी. बीड जिल्हयातील सर्व नागरिकांनी आयोजीत सुकन्या समृद्धी योजना पंधरवाडाचा लाभ घेण्याचे आवाहन बीड डाकघरचे विभागाचे अधीक्षक एम. अली यांनी केले आहे.
सर्वात कमी गुंतवणूकीची बचत योजना
सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र शासनाची मुलींसाठीची महत्वाकांक्षी योजना आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानअंतर्गत ही योजना 22 जानेवारी, 2015 रोजी देशभरात सुरू केली. ही योजना विशेष मुलींसाठी असून, केंद्र शासनाची सर्वात कमी गुंतवणूकीची बचत योजना आहे . मुलींच्या लग्नाच्या वेळी किंवा उच्च शिक्षण घेताना ही गुंतवणूक अतिशय फायदेशीर ठरते . या योजनेला ‘पंतप्रधान सुकन्या योजना’ असेही म्हणतात.