‘अनाथांची माय’ गेल्यानं लेकरं पोरकी !
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
‘अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ (73 ) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. पुण्यातील एका खासगी त्यांच्यावर उपचार सुरू होते.

२४ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कारानं देखील गौरविण्यात आलं होतं. मध्यंतरी त्यांना पद्मश्रीनं देखील गौरविण्यात आलं होतं. ‘अनाथांची माय’ असलेल्या सिंधुताई यांच्या जाण्यानं त्यांची लेकरं पोरकी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत. महानुभाव पंथातील असल्याने त्यांच्यावर ठोसर पागा येथील स्मशानभूमीत बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
'बाळ धनंजय, माईने समाजाला खूप दिलं, पण माईच्या संस्थेला सरकार म्हणून काहीतरी देणारा तूच रे पहिला…असं म्हणून माझ्या कार्याला अभिनव पोहोच पावती देणारी अनाथांची माय, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त व्यथित करणारे आहे. निस्वार्थ समाजसेवा या शब्दाचा समानार्थी शब्द माई! pic.twitter.com/rpNiDBDR8S
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 4, 2022
सिंधुताईंचा खडतर प्रवास…आईच्या विरोधामुळे आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे लहानपणी सिंधुताई यांच्या शिक्षणाला खीळ बसली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर देखील त्यांचा संघर्ष संपला नाही. त्यांना घर सोडावे लागले. गोठ्यात मुलीला जन्म द्यावा लागला. रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकावर त्यांना भीक मागावी लागली. स्वतःला आणि मुलीला जगविण्याचा त्यांचा पुन्हा संघर्ष सुरू झाला. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईनी आपल्या जीवनाचे धडे घेत महाराष्ट्रात अनाथांसाठी सहा अनाथाश्रम स्थापन केले त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला.
त्यांच्यामार्फत चालविल्या जाणार्या संस्थांनी असहाय्य आणि बेघर महिलांना मदत केली. आजवर सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.“मी सिंधुताई सपकाळ” या सिंधुताई सपकाळ यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित चित्रपटाची ५४ व्या लंडन चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियरसाठी निवड करण्यात आली होती.