-श्री. संत वामनभाऊ व श्री. संत भगवानबाबा मंदिर वार्षिक सप्ताहाची सांगता
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
संतांनी आपल्या विचारातून मनाला शांती आणि जीवनात क्रांती निर्माण करून देणारे विचार दिले आहेत. माणसाच्या आयुष्यात अनेक चढउतार येतात, त्यात अडचणीच्या वेळी शुद्ध विचारांची नितांत गरज असते. संत वामनभाऊ आणि संत भगवान बाबा यांचे विचार समाजाला योग्य दिशा दाखवणारे आहेत. या विचारांची देवाण घेवाण होणे गरजेचे असल्याचे मत नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

बीड शहरातील माऊली नगर येथे श्री.संत वामनभाऊ व श्री.संत भगवान बाबा मंदिर वार्षिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्र वार दि.31 रोजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते किर्तन काल्याची दहीहंडी फोडून काल्याचे किर्तन संपन्न झाले. यावेळी डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, पुढील काळात श्री.संत वामनभाऊ आणि श्री.संत भगवान बाबा यांचा भक्तगण म्हणून सहकार्य करणार असुन, या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन म्हणजे वामन भाऊ व भगवान बाबांच्या विचारांची देवाण-घेवाण करण्याचा योग आहे. यामुळे परिसरातील नागरिकांत देखील संवाद वाढतो आणि परिसराचे वातावरण आनंददायी रहाते. शहरात अनेक सप्ताह होतात परंतु भाऊ-बाबा यांचा योग मात्र येथेच जुळुन येतो. त्यामुळे बीड शहरात तरी ते या भागात होत आहे. याबद्दल मी आयोजकांचे अभिनंदन करतो व आभार मानतो असे यावेळी नगराध्यक्षांनी बोलतांना सांगितले.

यावेळी सर्जेराव तांदळे, नगरसेवक विलास विधाते, सादेक भाई, सुधाकर मिसाळ, अंबादास जाधव, केशव बडे, विष्णू खेडकर, वैभव गुठ्ठे, आघाव यांच्यासह परिसरातील भाविक-भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.