तत्कालीन उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह 15 जणांविरूध्द गुन्हा दाखल
आष्टीनंतर बीडमध्ये मोठा भूखंड घोटाळा उजेडात
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
वक्फ बोर्डच्या सुमारे 409 एकर क्षेत्र खालसा (खिदमतमाश मधून मददमाश मध्ये रूपांतरीत) करून खासगी लोकांच्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी प्रकाशात आला. याप्रकरणी तीन सिद्दिकी भावंडे, तत्कालीन उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह महसूलच्या आठ अधिकारी- कर्मचार्यासह 15 जणांविरूध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आष्टी तालुक्यातील चिंचपूर व रु ईनालकोल येथील देवस्थान व वक्फ बोर्डच्या जमिनीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण गाजत असतानाच आता हा मोठा भूखंड घोटाळा उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे.

हजरत शहंशाहवली दरगाहची जिल्ह्यात 796 एकर जमीन आहे. सदरची जमीन बीड शहर व जिल्ह्यात बहाल करण्यात आली आहे. या जागेचा 1938 पासून महसूलच्या अभिलेखा दस्ताऐवज व राज्य सरकारच्या अखत्यारितील वक्फ राजपत्रात 1974 पासुन दरगाह संबंधित अधिकृत नोंद आहे. जिल्हा वक्फ अधिकारी अमीनजुमा खलीखुजमा यांच्या तक्रारीनुसार, दरगाहची 409 एकर 5 गुंठे जमीन बनावट कागदपत्र तयार करु न सदर जागेचा अवैध खालसा करून खासगी लोकांच्या नावे करण्यात आली. दर्गा हजरत शहंशाहवली दर्गाची दहा एकर जमीन राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 लगत सर्व्हे क्र .22 व 95 मध्ये आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणात या जमिनीचा सुमारे 15 कोटी रुपये मावेजा आला होता. सदरील मावेजा हडपण्याच्या हेतुने महसूल अधिकाºयांना हाताशी धरून खासगी लोकांच्या नावे करण्यात आली. यासाठी लाचखोरी व मोठ्या प्रमाणात पैश्यांची देवाण-घेवाण झाल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे.
सदरील तक्रार व गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी शिवाजीनगर ठाण्यात भेट दिली. पीआय केतन राठोड, एपीआय अमोल गुरमे व पीएसआय बाळराजे दराडे यांनी दाखल तक्रारीची पडताळणी करून गुन्हा नोंद केला. या प्रकरणी हबीबोद्दीन सरदारोद्दीन सिद्धीकी (रा. सिडको एन 12 प्लॉट क्र . 14, औरंगाबाद), रशीदोद्दीन सरदारोद्दीन सिद्धीकी, कलीमोद्दीन सरदारोद्दीन सिद्धीकी (दोघे रा. शिवाजीनगर, बीड), अशफाक गौस शेख (रा.राजीवनगर, बीड ), अजमतुल्ला रजाउल्ला सय्यद (रा. झमझम कॉलनी, बीड), अजीज उस्मान कुरेशी (रा. मोमीनपुरा, बीड), मुजाहिद मुजीब शेख (रा. बीड मामला, मोमीनपुरा, बीड), तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, महसूल सहायक खोड, महसूल सहायक मंडलिक (अपूर्ण नाव), तत्कालीन मंडळाधिकारी पी.के.राख, तत्कालीन तलाठी हिंदोळे (अपूर्ण नाव), सध्याचे तलाठी पी. एस. आंधळे, तत्कालीन तहसीलदार व अधिकारी- कर्मचायासह 15 जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सदरील गुन्हाची व्याप्ती मोठी असल्याने आरोपींची संख्या आणखी वाढले अशी माहिती सूत्रांनी दिली.