जिल्हा वासियांचं स्वप्न साकार
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून बुधवारी सकाळी नगरहून सोलापूर वाडी व तिथुन आष्टी पर्यंत रेल्वे धावली आहे. पटरीवरून रेल्वे धावल्याचे पाहून जिल्हावासियांना स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.

अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग 261 किलोमीटरचा असून गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न रखडला होता. रेल्वेमुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यात मोठ्या अडचणी होत्या. शिवाय बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या 1995 साली या नगर बीड परळी रेल्वे मार्गला तत्वतः मंजुरी मिळाली होती. मात्र त्यानंतर अनेक वर्ष राजकीय इच्छाशक्ती अभावी या मार्गाचे काम रखडले.
स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी बीड जिल्हा वासियांना बीड रेल्वे चे स्वप्न दाखवले होते. रेल्वे मार्गासाठी भरभरून योगदान देत पंतप्रधान नरेंद्र मोदी कडे हट्ट धरून या मार्गासाठी निधीची तरतूद करण्यास भाग पाडले. सद्यस्थितीत हा प्रकल्प तीन हजार कोटी च्या पुढील असून नगर ते आष्टी साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली असताना मागील महिन्यात धावणारी रेल्वे तांत्रिक अडचणीमुळे धावली नव्हती. पण बुधवारी सकाळी नगर वरून आष्टीच्या दिशेने मार्गस्थ झाली. बीड जिल्हावासियांना गेल्या अनेक वर्षापासूनचे रेल्वेचे स्वप्न होते ते अखेर पूर्णत्वाकडे जात असल्याचे पाहावयास मिळाले. सोलापूर वाडी, कडा,आष्टी या ठिकाणी व पटरीवरून रेल्वे धावल्यामुळे ते पाहण्यासाठी गर्दी केली होती. याच मार्गावर हायस्पीड रेल्वे धावली.

आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव येथील सर्वात मोठ्या रेल्वे पुलावरून हायस्पीड रेल्वे आज बुधवारी सुखरूपपणे धावली. हा 15 स्पॅनचा पूल असून प्रत्येकाची लांबी 30.5 मीटर आहे. म्हणजेच जवळपास अर्धा किलोमीटर लांबीचा तर शंभर फूट उंचीचा हा पुल आहे.