यावर्षीचा दर्पणकार पुरस्कार गुलाब भावसार यांना तर आदर्श पेपर विक्रेते पुरस्कार प्रतापराव सासवडे यांना जाहीर
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडच्या वतीने दर्पण दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावर्षीचा बीडचे दर्पणकार पुरस्कार ज्येष्ठ संपादक गुलाब भावसार यांना जाहीर झाला आहे. तर आदर्श पेपर विक्रेते म्हणून प्रतापराव सासवडे यांना जाहीर झाला आहे.

6 जानेवारी रोजी दर्पण दिन पुरस्कार सोहळा स. मा. गर्गे भवन, नाट्यग्रह जवळ, बीड येथे सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. या दोन्ही पुरस्कारार्थीना मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्याच बरोबर समाजकार्य करणार्या अनेक मान्यवरांना देखील पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांचा 1 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त आणि 6 जानेवारी रोजी दर्पण दिनाचे औचित्य साधून संपूर्ण मराठवाड्यामध्ये यावर्षी दर्पण सप्ताहाचे आयोजन केले आहे. बीड येथे 1 जानेवारी रोजी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिल बारकुल यांच्या हॉस्पिटलमध्ये पत्रकारांसाठी विनामूल्य हृदय तपासणी, बी.पी. व शुगर तपासणी करण्यात येणार आहे.याची वेळ सकाळी 10.30 ते 12.30 राहणार आहे. 2 जानेवारी रोजी स्वर्गीय झुंबरलाल खटोड प्रतिष्ठान संचलित आनंदऋषीजी नेत्रालय, व्हिजन सेंटर, जालना रोड, बीड येथे मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. 3 जानेवारी ते 5 जानेवारी दरम्यान बीड जिल्हा सरकारी रुग्णालयात सकाळी 10 ते दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी पत्रकारांसाठी आयोजित केली आहे.
दर्पणदिनाचे औचित्य साधून याच ठिकाणी सकाळी 10 ते 11 दरम्यान प्रसिद्ध बासरी वादक अमर डागा यांचे सुमधुर बासरी वाद्य लाईव्ह होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत दर्पण दिन सोहळा आणि दर्पणकार पुरस्काराचे शानदार वितरण होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर बीड जिल्ह्यातील वंचित, उपेक्षित, पीडित यांच्या न्याय हक्कासाठी झटणाऱ्या समाज हितचिंतक तसेच गोमाता, वन्य पशुपक्षी आणि गोरगरिबांची निस्वार्थ सेवा करणाऱ्या समाज सेवकांना देखील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ पत्रकारांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत मोटर वाहन लर्निंग लायसन कॅम्प या ठिकाणी आरटीओ यांच्या सौजन्याने होणार आहे.
या संपूर्ण सप्ताहातील उपक्रमास आणि दर्पण दिन सोहळ्यास बीड जिल्ह्यातील तमाम पत्रकार,पत्रकार हितचिंतक, प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, प्रत्यक्ष सहभागी होऊन हा उपक्रम आणि दर्पण दिन कार्यक्रम ऐतिहासिक करावा असे आवाहन पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.